निरर्थक बहिष्कार


तामिळनाडू आणि कर्नाटकामध्ये पेप्सी आणि कोला या दोन कंपन्यांच्या विरोधात जनमत मोठ्या प्रमाणावर प्रक्षुब्ध झालेले आहे. त्यातूनच या दोन राज्यातल्या छोट्या दुकानदारांनी या दोन थंड पेयांची विक्री न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १ मार्च पासून या बहिष्काराचा अंमल जाहीर झाला होता पण अजून तरी तो पूर्णपणे अंमलात आलेला नाही. कारण अनेक व्यापारी जुना स्टॉक विकत आहेत आणि काही व्यापार्‍यांचा या बहिष्काराला विरोध असल्यामुळे ते या पेयांची विक्री करत आहेत. या दोन राज्यांच्या पाठोपाठ केरळातील व्यापार्‍यांनीसुध्दा या दोन थंड पेयांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या थंड पेयांची निर्मिती तामिळनाडूत होते. राज्यात दुष्काळ असतानाही ही निर्मिती सुरू आहे आणि १ लीटर थंड पेय तयार करताना ५ लीटर पाणी वापरावे लागते. ही पाण्याची नासाडी थांबावी यासाठी हा बहिष्कार आहे.

राज्यातल्या काही संघटनांनी या कंपन्यांवर बंदी घालावी अशी मागणी केली होती. परंतु ती मागणी सरकार मान्य करू शकत नाही. म्हणून असा सामाजिक बहिष्कार टाकून या कंपन्यांना नमविण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. मात्र हा बंद यशस्वी होईल की नाही याविषयी काही लोकांच्या मनात शंका आहेत. कारण पेप्सी आणि कोलाच्या १ लीटरसाठी ५ लीटर पाणी लागते हे बहिष्कारासाठीचे कारण समर्थनीय नाही. तसे असल्यास ज्या ज्या कारखान्यांमधून अशा प्रकारे पाण्याचा वापर होतो त्या सर्व कारखान्यांतील उत्पादने बंद करणे भाग पडेल किंवा याच न्यायाने या दोन थंड पेयांवर बंदी घातली गेली असेल तर त्याच न्यायाने पाण्याचा वापर होणार्‍या अन्यही उत्पादनांवर व्यापार्‍यांना बहिष्कार घालावा लागेल.

पाण्याच्या कारणावरून पेप्सी आणि कोला या दोन पेयांनाच नेहमी लक्ष्य केले जाते. परंतु असे लक्ष्य करणार्‍या लोकांनी अन्यही उत्पादनांची माहिती घेतली तर त्यांच्या असे लक्षात येईल की या दोन पेयांपेक्षाही अधिक पाणी वापरून काही उत्पादने केली जात असतात. परंतु पेप्सी आणि कोला या पेयांचा पाण्याचा वापर नेहमीच चर्चेचा विषय होतो. तसा तो अन्य पेयांचा होत नाही. त्यामुळे एका बाजूला देशभक्तीचा आव आणून पेप्सी आणि कोलाच्या विरोधात शिरा ताणून घोषणा दिल्या जातात पण दुसर्‍या बाजूला देशी दारू, शिंदी आणि विदेशी दारू यांच्या उत्पादनात पाण्याचा असा वापर होत असूनही त्यांच्या विरोधात कोणी बहिष्काराच्या घोषणा करत नाही.

Leave a Comment