महिलांची घुसमट


उद्या महिला दिन साजरा होत आहे. या निमित्ताने समाजातले महिलांचे स्थान आणि त्यांची अवस्था या संबंधात विचारवंत विचार करतील. महिलाही आपली बाजू मांडतील आणि त्यातून महिलांच्या अवस्थेचे चित्र जगासमोर येईल. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर हे चित्र फार संमिश्र स्वरूपाचे आहे. कारण एका बाजूला महिला अत्युच्च शिखरावर आरूढ होत असताना दिसत आहेत तर दुसर्‍या बाजूला महिलांच्या जीवनातली महिला म्हणून होत असणारी घुसमट वाढताना दिसत आहे. अगदी शालेय वयातच मुलींना समाजामध्ये दुय्यम स्थान दिले जात असल्याची जाणीव व्हायला लागते. कुटुंबापासून समाजापर्यंत सर्वत्र स्त्रियांकडे दुर्लक्ष आणि त्यांच्या समस्यांविषयीची उदासीनता प्रखरतेने त्यांना जाणवायला लागते. ग्रामीण भागामध्ये कित्येक शाळांत मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृहे नाहीत. वास्तविक पाहता मुलींची ही एक प्राथमिक गरज असते. पण तिचे भान शाळांच्या इमारती बांधताना कोणालाच राहत नाही. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह ही एक गरज आहे आणि मुलींसाठी ती निकडीची गरज आहे असा कोणी विचारच करत नाही.

याचा परिणाम असा होतो की कित्येक मुली सहावी, सातवीपासून शाळेत येणे बंद करून टाकतात. अशा कित्येक मुलींचे शिक्षण शाळा इमारती बांधणार्‍यांच्या आणि त्यांचे नकाशे तयार करणार्‍यांच्या स्त्रियांकडे बघण्याच्या उपेक्षेच्या दृष्टिकोनामुळे बंद होते. समाजाचा रात्रंदिवस विचार करणारे विचारवंत आणि नेते हेसुध्दा अशी काही समस्या आहे याबाबत अनभिज्ञ असतात. काही शाळांमध्ये स्वच्छता गृहे असली तरी मुलींचे शाळेत जाणे बिनधोक राहिलेले नाही. घरापासून ते शाळेपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी उभे असलेले सडकसख्याहरी त्या मुलींचे शाळेत जाणे मुश्किल करून टाकतात. शिकण्याची अतीव इच्छा असूनही रस्त्यावरच्या टोमणे आणि छेडाछेडीला कंटाळून कित्येक मुलींनी शिक्षण सोडून दिले आहे. २०१२ साली सरकारने या परिस्थितीची खास पाहणी केली होती. तेव्हा असे आढळले की, छेडाछेडीला कंटाळून महाराष्ट्रातल्या १०५६ मुलींनी आत्महत्या केलेल्या आहेत. एका वर्षात एवढ्या मुली आत्महत्या करत असतील तर किती मुली छेडाछेडीमुळे त्रस्त झालेल्या असतील याचा अंदाजसुध्दा करवत नाही. खरे म्हणजे ही समस्या पोलिसांसाठी सोपी आहे. परंतु तिच्याकडे मुलींची समस्या बघण्याचा जो उपेक्षेचा दृष्टिकोन आहे तोच मुलींच्या पूर्ण भवितव्यावर परिणाम करून जातो.

स्वच्छतागृहांचा आणि छेडाछेडीचा प्रश्‍न हा केवळ विद्यार्थिनींपुरताच मर्यादित नाही. नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या जवळपास सर्व महिलांना प्रवासाच्या वाहनापासून ते कार्यालयापर्यंत सर्वत्र पुरूषी मनोवृत्ती आणि लंपट नजरा यांचा नेहमीच सामना करावा लागतो. या संबंधात करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये ८० टक्के महिलांनी आपल्या जीवनातली ही एक समस्या आहे एवढेच नव्हे तर ती जीवघेणी समस्या आहे असे आवर्जुन नमूद केले होते. यावर सरकारने उपाययोजना केली पाहिजे हे तर खरेच आहे. परंतु या प्रश्‍नाची सोडवणूक करण्याचा खरा मूलभूत उपाय म्हणजे पुरुषांची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी बदलणे हा आहे. हा बदल प्रबोधनाने तर होईलच परंतु आपण किमान सभ्यपणे वागले पाहिजे. एवढा संस्कार जरी लोकांच्या मनावर झाला तरी समस्येतून बरीच सोडवणूक होईल. पुरुष हा श्रेष्ठ असतो आणि ती स्त्री ही कनिष्ठ असते हा संस्कार अगदी बालपणापासून मुलांच्या मनावर झालेला असतो. किंबहुना तसा तो मुलींच्याही मनावर केलेला असतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मुलामुलींच्या आया म्हणजे महिलाच हा संस्कार दृढ होण्यासाठी प्रयत्नशील असतात.

हा संस्कार पुसून टाकायचा असेल तर पुरुषांना जरा आपल्या आसपास नजर टाकावी लागेल. ती टाकल्यास त्याच्या असे लक्षात येईल की कितीतरी क्षेत्रांमध्ये महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करायला लागल्या आहेत. अर्थात ही गोष्ट जुनीच झालेली आहे पण तरीसुध्दा पुरुषी वर्चस्वाची भावना स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान देऊ देत नाही. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत ही गोष्ट आणि उक्ती जुनी झालेली आहे. आताचे वास्तव असे आहे की काही क्षेत्रात महिला पुरुषांच्या पुढे आहेत. त्यांनी काही क्षेत्रे अशी काही काबीज केलेली आहेत की तिथे पुरुषच अल्पसंख्य होऊन उपेक्षित झालेले आहेत. तेव्हा समाजात झालेला हा बदल मोकळ्या मनाने मान्य करून पुरुषांनी स्त्रियांना बरोबरीचे आणि गरज पडल्यास मानाचे स्थान द्यावयास शिकले पाहिजे. तसे होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच स्त्रियांची समाजातली घुसमट पूर्वीप्रमाणेच जारी आहे. अर्थात ही अवस्था भारतासारख्या मागासल्या देशातच आहे असे नाही. तर यूरोप आणि अमेरिकेसारख्या कथित प्रगत समजल्या जाणार्‍या देशातसुध्दा ती तशीच आहे. म्हणूनच सर्व जगभर आज ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून पाळावा लागत आहे. एक वेळ अशी आली पाहिजे की जेव्हा महिला पूर्ण सक्षम आणि समर्थ होतील की त्यांच्यासाठी असा एक दिवस पाळण्याची अजिबात गरज पडणार नाही.

Leave a Comment