इशांतने स्मिथची केलेली नक्कल सोशल मीडियावर व्हायरल


बंगळुरू कसोटीत भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यासाठी स्लेजिंगचाही पर्याय अवलंबला गेला. इशांत शर्माने कसोटीच्या दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी टीच्चून मारा केला. दरम्यान, इशांतने मैदानात जम बसवलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याची एकाग्रता भंग करण्यासाठी खेळपट्टीवरच खुलेआम आव्हान दिले. इशांतची स्मिथसोबत बाचाबाची देखील झाली. फलंदाजीवेळी स्मिथच्या चेह-यावरच्या हावभावाची नक्कल करून इशांतने फलंदाजांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मग, स्मिथनेही पुढच्या चेंडूवर इशांतला डिवचले.

सध्या सोशल मीडियावर इशांतने स्मिथची केलेली नक्कल चांगलीच व्हायरल झाली असून नेटिझन्सने इशांतने केलेल्या हावभावाचा वापर करून आपल्या कल्पक बुद्धीने त्याचा फोटो विविध ठिकाणी वापरून खिल्ली उडवली आहे. एका नेटिझनने इशांतचा चेहरा सुपरमॅनच्या जागी वापरला आहे, तर काहींनी डोनाल्ड ट्रम्पच्या चेह-यावर इशांतचा चेहरा वापरून फोटो व्हायरल केले आहेत. ‘कुछ कुछ होता है’ या सुपरहीट बॉलीवूड चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरूखच्या जागी इशांतचा फोटो वापरून एका नेटिझनने धम्माल उडवून दिली आहे. इशांतचा फोटो अगदी हॉलीवूडपर्यंत देखील पोहोचला आहे. ‘एक्समॅन’ चित्रपटाच्या पोस्टरमध्येही इशांतच्या चेह-याचा समावेश करण्याचीही कल्पकता काही नेटिझन्सनी वापरली आहे.

Leave a Comment