चीनचे उत्खनन कार्य


भारताला प्रगती करण्यासाठी परदेशी भांडवलाची गरज असल्याचे सांगितले जाते आणि त्यासाठी आपले पंतप्रधान सातत्याने परदेश दौर्‍यावर जात आहेत. परंतु अशा रितीने भांडवलासाठी परदेशात जाऊन तिथल्या भांडवलदारांची याचना करण्याऐवजी आपल्या देशातच निसर्गाने दिलेली जी साधने आहेत त्यांचाही विकास आपण केला पाहिजे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात व्यक्त केले होते. निसर्गाने आपल्याला तीन बाजूंनी समुद्र दिलेला आहे. या समुद्राच्या पोटात खरोखरच काय दडलेले आहे याचा आपण फार खोलात जाऊन विचार केलेला नाही. समुद्र्राच्या साधारण १०० मीटर खोलीपर्यंत आपण सध्या मच्छिमारी करत आहोत. पण प्रत्यक्षात समुद्राची खोली ६ किलोमीटर आहे. १०० मीटरच्या खाली ६ किलोमीटरपर्यंत कितीतरी नैसर्गिक साधने उपलब्ध होऊ शकतात.

चीनने एवढ्या खोलात जाऊन संशोधन करायला सुरूवात केली आहे. चीनच्या जियाओलांग नावाच्या पाणबुडीने ३ किलोमीटर खोलीपर्यंत जाऊन तिथून मौल्यवान धातू गोळा केले आहेत. चीनला एवढ्या खोलीवर हे धातू शोधण्यासाठी आपली पाणबुडी १२४ दिवस तेवढ्या खोलीवर नेऊन शोधकाम करावे लागले आहे. चीनने या दिशेने केलेले प्रयत्न फार वाखाणण्याजोगे आहेत. त्या क्षेत्रात अजून भारताला फार काही करता आलेले नाही. चीनने मात्र एवढ्या खोलीवर जाऊन सल्फाईड आणि बेसॉल्टचे नमुने गोळा करून आणले आहेत. त्या नमुन्यामध्ये काही वायू सापडले आहेत. चीनला समुद्र किनारा लाभलेला नाही. त्यामुळे चीनची नजर नेहमीच बंगालच्या उपसागराकडे आणि हिंद महासागराकडे असते. त्यातला हिंद महासागरातील १० हजार चौरस किलोमीटरचा सागरी प्रदेश चीनने आंतरराष्ट्रीय महासागरी प्राधिकरणाशी करार करून भाड्याने घेतला आहे.

या सागरी हद्दीत आजवर चीनने ३८ मोहिमा काढल्या आहेत आणि त्यातून चीनला पॉलिमेटॅलिक गंधक आणि त्यांची संयुगे मिळतील अशी अपेक्षा आहे. आता चीनने उत्खनन करून आणलेल्या नमुन्यामध्ये हे वायू आहेत का याचा शोध घेणे जारी आहे. केवळ पॉलिमेटॅलिक गंधकच नव्हे तर इतरही काही दुर्मिळ मूलद्र्रव्ये किंवा वायू या उत्खननातून प्राप्त होऊ शकतो. चीनची सागराच्या पोटात जाऊन उत्खनन करण्याची ही चिकाटी मानवतेसाठी निश्‍चितच वरदान ठरणारी आहे.

Leave a Comment