आणखी एक शिरपेच


गेल्या महिन्यात इस्रोने एकाच दमात १०४ उपग्रह अवकाशात सोडून सर्वांना चकित केले. अमेरिकेला तर ही गोष्ट आधीच माहीत होती कारण या १०४ उपग्रहात जास्तीत जास्त उपग्रह अमेरिकेचेच होते. चीनचा या कामगिरीने जळफळाट झाला. आजवर चीन भारताकडे एक गरीब देश म्हणून पहात आला आहे. भारताने अणुचाचण्या घेतल्या तेव्हा चीनने, गरीब देशाला काय करायच्या आहेत अशा चाचण्या, त्यांनी आधी लोकांना खायला मिळतेय की नाही हे पहावे, असा हितोपदेश केला होता. त्याला भारताची प्रगती देखवत नाही हे तर उघडच आहे. आताही १०४ उपग्रहाचा प्रयोग यशस्वी झाला आणि भारताने जगातल्या पहिल्या पाच देशात आपल्या नावाची नोंद केली तेव्हा याच चीनने, अशा कामात नंबर वगैरे काही नसतात अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अर्थात भारताने अवकाशात १०० उपग्रह सोडले काय की २०० सोडले काय चीनवर त्याचा काही थेट परिणाम होणार नाही. अशा प्रकारात केवळ स्पर्धेची भावना असते. असे उपग्रह सोडल्याने भारत देश पुढे गेला एवढेच चीनला समजले.

भारताकडून संरक्षणाशी संबंधित काही कामगिरी केली जाते तेव्हा मात्र चीनला तिची दखल घ्यावी लागते कारण ती कामगिरी थेट चीनला इशारा देणारी असते. भारताचा आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम हा चीनच्या संरक्षण सिद्धतेला इशारा देणारा असतो. म्हणूनच चीनचा भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावरून नेहमीच जळफळाट होत असतो. भारताचे ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र जगातले सर्वात वेगवान क्षेपणास्त्र आहे. तसे क्षेपणास्त्र तयार करणे चीनला तर शक्य झालेलेच नाही पण अमेरिकेलाही शक्य झालेले नाही. त्यामुळे ब्रह्मोस क्षेपणास्त्र तयार झाल्यापासून अमेरिकेच्या शास्त्रज्ञांत अस्वस्थता आहे. पृथ्वी हे क्षेपणास्त्रही अशीच अमेरिका आणि चीन या दोन महाशक्तींची अस्वस्थता वाढवणारे ठरले आहे कारण त्याचा पल्ला एवढा लांबचा आहे की, त्याच्या कक्षेत चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश येतात. म्हणजे पल्ला आणि वेग या दोन्ही बाबतीत भारताने जगाला स्तिमित करणारे यश मिळवले आहे. आता काल भारताच्या संरक्षण संशोधन संघटना (डीआरडीओ. या यंत्रणेने इन्टरसेप्टरची दुसरी चाचणी यशस्वी केली आहे. डीआरडीओ ही यंत्रणा संरक्षण खात्याच्या अखत्यारित येते. तिच्या शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्रांची मदत घेऊन हे इन्टरसेप्टर तयार केले असून त्याची चाचणी काल घेण्यात आली आहे. ती यशस्वी झाल्याने शास्त्रज्ञांत आनंदी आनंद पसरला आहे.

आधी इन्टरसेप्टर म्हणजे काय हे समजावून घेऊ. आपल्या सभोवताली पाकिस्तान, चीन अशा अण्वस्त्रधारी शक्ती आहेत. त्यांच्याकडून भारतावर कधीही अणुबॉंबचा हल्ला होऊ शकतो. पाकिस्तान तर आपल्याला नेहमीच धमक्या देत असते. खरे तर पाकिस्तानचा जीव केवढा? पारंपरिक पद्धतीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर पाकिस्तानला बेचिराख करायला फार तर आठ दिवस लागतील. तसा इशारा भारताच्या सेनाधिकार्‍यांनी तर अनेकदा दिलेलाच आहे पण पाकिस्तानचे नेतेही अशीच ग्वाही देत असतात. पाकिस्तानातले अनेक नेते म्हणत असतात की, पाकिस्तानला या जगाच्या नकाशावरून नामशेष करून टाकायला भारताला फार तर आठ दिवस लागतील. या दोन देशातल्या लष्करी सिद्धतेतली विषमताच तेवढी आहे. असे असूनही पाकिस्तान अधुनमधुन भारतावर अणुबॉंब टाकण्याचा इशारा देत असते. या जगात अणुबॉंब तयार झाला तेव्हाच तो तयार करणारांनी, तो वेड्यांच्या हातात गेला तर जगात अणुयुद्ध होऊन हाहाकार माजेल असे म्हटले होते. त्याची प्रचिती येत आहे.

अमेरिकेकडे एवढी अण्वस्त्रे आहेत की त्यांचा वापर करून अमेरिका या जगाला अवघ्या सहा मिनिटांत बेचिराख करू शकते पण एवढी शक्ती असूनही अमेरिका कधी कोणाला अण्वस्त्रांची धमकी देत नाही कारण त्याचे परिणाम अमेरिकेला माहीत आहेत. पाकिस्तान काहीही करू शकते. अशा वेळी आपण असे एक क्षेपणास्त्र तयार केले आहे की जे पाकिस्तानच्या त्या अणुबॉंबला भारतापर्यंत येऊच देणार नाही. पाकिस्तानातून अणुबॉंब घेऊन एखादे क्षेपणास्त्र भारताकडे झेपावले तर ते तिथून निघतानाच भारताच्या इन्टरसेप्टरला कळेल आणि हे इन्टरसेप्टर पाकिस्तानच्या त्या क्षेपणास्त्राला भारतात पोचण्याच्या आधीच वाटेत पाडून टाकेल. अशी ही अणुहल्ल्याचा प्रतिकार करणारी प्रभावी यंत्रणा आहे. ही यंत्रणा भारताच्या शास्त्रज्ञांनी पूर्णपणे देशी साधनांच्या मदतीने तयार केली आहे. आता आता अशा कोणत्याही किचकट आणि उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारलेली कामे भारताचे शास्त्रज्ञ पूर्णपणे आपल्या स्वत:च्या बळावर करायला लागले आहेत. आता कोणत्याही तांत्रिक कामासाठी अमेरिका किंवा रशिया यांची मदत घेण्याची भारताला गरज राहिलेली नाही. १०४ उपग्रहाच्या पाठोपाठ आता इन्टरसेप्टरचे यश मिळवतानाही आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. शास्त्रीय संशोधनातली अनेक आव्हाने जिंकण्याची क्षमता भारतीयांनी वाढवली आहे. आपण गर्वाने मान ताठ करावी असा हा क्षण आहे.

Leave a Comment