भ्रष्ट अधिकारी गजाआड


देशातले सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतात. ही गोष्ट सर्वांना माहीतच आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम हाती घेतली आहे. केवळ शारीरिक आणि भौतिक स्वच्छता निर्माण न करता नैतिक शुध्दताही वाढवली पाहिजे असा पंतप्रधानांचा आग्रह आहे. म्हणूनच गेल्या तीन वर्षात त्यांच्या सरकारने भ्रष्टाचार विरहीत प्रशासन देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. या कालावधीत केंद्रातल्या एकाही मंत्र्याच्या विरोधात सरकारच्या विरोधकांनाही भ्रष्टाचाराचा एकही आरोप करता आला नाही. अगदी अफवांवर आधारलेला आरोपसुध्दा कोणी केलेला नाही. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकालात एकही महिना असा गेलेला नाही की ज्यामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. सातत्याने असे आरोप होत आले आणि त्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारच्या स्वच्छ कारभाराची प्रशंसा केली जात आहे. असे असले तरी मोदी सरकारची ही स्वच्छता मोहीम अजून प्रशासनात पूर्णपणे उतरलेली नाही.

केंद्रातले मंत्री पैसे खात नाहीत परंतु शासनातले अधिकारी मात्र पूर्वीप्रमाणेच भ्रष्टाचार करत आहेत. त्यांचा अपहाराचा सिलसिला यथावत सुरू आहे. मात्र त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट अशी की त्यांनी अजून भ्रष्टाचारमुक्ती मनावर घेतली नसली तरी सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणा अशा भ्रष्ट अधिकार्‍यांच्या मागे हात धुवून राहिलेल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक भ्रष्ट अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक उपाययोजनांच्या कक्षेत येत आहेत आणि अधिकाधिक सरकारी अधिकारी उघडे पडत आहेत. सीबीआयसारख्या यंत्रणांनी अशा अधिकार्‍यांवर खटले भरले तरी खटल्यात काही कच्चे दुवे राहतात, पोलीसच युक्तिवाद नीट करत नाहीत, पुरावे म्हणावे त्या नेकीने गोळा केले जात नाहीत. त्यामुळे पकडलेला अधिकारी यथावकाश निर्दोष सुटतो. किंवा एखाद्या अधिकार्‍याला तशी शिक्षा झालीच तर ती इतकी उशिरा होते की तोपर्यंत लोक त्या अधिकारावर खटला भरल्याची गोष्ट विसरून गेलेले असतात. परंतु उस्मानाबाद येथील भूसंपादन अधिकारी शोभा राऊत यांना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. एका नागरिकाकडून ३९ हजार २०० रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या खटल्यामध्ये त्या दोषी आढळल्या अाणि त्यांना उस्मानाबाद येथील सत्र न्यायालयात चार वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

उस्मानाबादच्या औद्योगिक वसातीमध्ये जमीन गेलेल्या एका शेतकर्‍याने आपल्या जमिनीतील झाडांचा अतिरिक्त मोबदला मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. शोभा राऊत यांनी तो मिळवून दिला. मात्र प्रत्यक्षात तो लाभधारकाच्या हातात टाकताना पाच टक्के लाच मागितली. ती प्रत्यक्ष देताना त्यांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्यात त्या दोषी आढळल्या. मात्र लाचखोरीच्या आरोपावरून चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्याचा पहिलाच खटला असल्यामुळे शासकीय अधिकार्‍यांमध्ये खळबळ माजली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात लाचखोरीबद्दल पूर्वी काही अधिकारी दोषी ठरले आहेत. परंतु तशा प्रकरणांमध्ये कोणालाही दोन वर्षांपेक्षा अधिक सजा झालेली नाही. शोभा राऊत यांना मात्र चार वर्षांची शिक्षा सुनावली गेली असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे काही अधिकारी सत्र न्यायालयाच्या पातळीवर दोषी ठरतात मात्र त्यांना दोषी ठरवणारा खटला जाहीर होताच त्यांना जामीन दिला जातो. अशा रितीने सदर अधिकारी जामिनावर मुक्त राहून उच्च न्यायालयात अपील करतात आणि तिथे यथावकाश निर्दोष सुटून जेलयात्रा टाळतात.

जामिनावर राहून उच्च न्यायालयात अर्ज देण्याची ही सवलत तीन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा झालेल्या आरोपींनाच उपलब्ध असते. शोभा राऊत यांची शिक्षा चार वर्षांची असल्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याची मुभा आहे मात्र अपील दाखल करताना त्यांना जामीन मिळणार नाही. परिणामी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला तरीही त्यांना तुरुंगात राहूनच अपिलाचे काम पहावे लागेल. उपविभागीय अधिकारी पदावर म्हणजेच उपजिल्हाधिकारी पदावर जबाबदारीने काम करतानाच पैशाचा मोह सुटून त्यांनी जी लाचखोरी केलेली आहे तिच्यामुळे आलिशान कार्यालयाऐवजी कुबट कारागृहामध्ये त्यांना जीवन कंठावे लागेल. सीबीआयने अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारच्या काही खटल्यांचे निकाल लवकर लावायला सुरूवात केली आहे आणि शासनाचे बरेच अधिकारी या जाळ्यात अडकायला लागले आहेत. शासनाच्या पातळीवर भ्रष्टाचार करणार्‍या शोभा राऊत या काही एकट्या नाहीत. त्यांच्यासोबत इतरही अनेक अधिकारी भ्रष्टाचार करत असतात. परंतु भ्रष्टाचार करतानासुध्दा अती पैसा खाल्ला की तो अशा रितीने घातक ठरतो. शोभा राऊत यांनी एवढा पैसा खाल्लेला होता की त्याला लपवायलासुध्दा जागा पुरत नव्हती. त्यांच्या घरामध्ये वस्तू दडवण्याच्या अनेक आश्‍चर्यकारक ठिकाणीसुध्दा नोटा सापडलेल्या आहेत. पैसा हे केवळ विनिमयाचे साधन आहे असे म्हणून त्याच्याविषयी कितीही निरीच्छता दाखवली तरी मोह काबूत न ठेवणारे अनेक लोक असतात. ते असे फसतात.

Leave a Comment