विवाहातला व्यर्थ खर्च


आपल्या समाजामध्ये दारिद्य्ररेषेच्या खालील जीवन जगणार्‍या कुटुंबांना या रेषेच्या वर आणण्याचा मोठा प्रयत्न नेहमीच केला जात असतो आणि सरकारच्या प्रयत्नातून तसेच स्वतःच्या धडपडीतून अनेक कुटुंबे ही दारिद्य्ररेषा पार करून तिच्यावर येण्यात यशही मिळवतात. परंतु या दिशेने प्रयत्न करणार्‍या काही कार्यकर्त्यांना एक विचित्र अवस्थासुध्दा दिसलेली आहे. एका बाजूला काही कुटुंबे दारिद्य्ररेषेच्या खालून वर येताना दिसत असतानाच काही कुटुंबे दारिद्य्ररेषेच्या वरून खाली येताना दिसत आहेत. ही त्यांची आर्थिक अधोगती होण्याची नेमकी कारणे काय याचा शोध घेतला असता असे दिसून आले की घरातली एखादी व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त असेल तर तिच्या वैद्यकीय उपचारावर होणार्‍या खर्चामुळेसुध्दा काल चांगले खातेपिते असलेले घर आज उद्ध्वस्त होते.

त्याचप्रमाणे घरात एखादा लग्न समारंभ झाला की त्या लग्न समारंभात सामाजिक प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनेपायी ऐपतीपेक्षा अधिक खर्च केला जातो आणि त्यामुळेसुध्दा काल चांगले असलेले कुटुंब आज कर्जाच्या विळख्यात सापडलेले आढळते. एवढे जर कारण समजत आहे तर विवाह थाटात करावेतच कशाला? असा प्रश्‍न कोणाच्याही मनात निर्माण होणे सहज शक्य आहे. परंतु प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना भिरकावून देऊन साध्या पध्दतीने विवाह करण्यासाठी आवश्यक असलेला सामाजिक आणि वैचारिक बदल ग्रामीण भागात म्हणावा तेवढा झालेला नाही. त्यामुळे विवाह समारंभ साजरे करणे आणि त्यावर पैसा उधळून कर्जबाजारी होणे हे ग्रामीण भागात नित्यच अनुभवाला येत आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये महाराष्ट्रात निघालेल्या मराठा समाजाच्या मूकमोर्चांमध्ये याही संदर्भात जागृती करण्याचा एक प्रयत्न झालेला दिसतो. कारण या मोर्चांमध्ये झळकावण्यात आलेल्या काही फलकांवर तसे संदेश लिहिलेले होते. तोच संदेश ग्रहण करून काही लोकांनी ग्रामीण भागामध्ये पैशावरचा वायफळ खर्च मर्यादित करण्याच्या दिशेने निश्‍चित पावले टाकायला सुरूवात केेलेली दिसत आहे. पुणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या विवाहात वधूवरांनी असा आदर्श घालून दिलेला आहे. विराज तावरे आणि केतकी मानकर या सामाजिक काम करणार्‍या तरुणांनी आपला विवाह पैसा उधळून साजरा न करता अपेक्षित खर्चाचे पैसे शैक्षणिक कामास दिले. या पैशातून रायगड, जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी या गावातील ५२ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आणि त्यापोटी २ लाख रुपये या मुलांच्या पालकांकडे सुपूर्द केले.

Leave a Comment