
नवी दिल्ली – नागरिकांकडून ट्विटरवर मांडल्या जाणा-या समस्या सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या ओळखल्या जातात. सुषमा स्वराज लोकांना मदत करण्यासाठी सोशल मीडियाचा चांगला उपयोग करतात, हे सर्वश्रुत आहेच. त्याचबरोबर सुषमा स्वराज परदेशात फसलेल्या नागरिकांना किंवा पासपोर्ट न मिळणा-यांना मदत करतात. त्यांनी पती कौशल यांच्यासोबतचा फोटो काही दिवसांपूर्वी ट्विटरवर शेअर केला. पण त्यांचे पती सुषमा यांना ट्विटरवर फॉलो करत नाही, ही वेगळीच गोष्ट. कौशल यांना यावर एका ट्विटर यूजरने विचारलेल्या प्रश्नावर त्यांचे उत्तर वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
सुषमा यांना त्यांचे पती ट्विटरवर करत नाही फॉलो
स्वराज कौशल यांना अंकू त्यागी नावाच्या ट्विटर यूजरने विचारले की, सर तुम्ही सुषमा स्वराज यांना ट्विटरवर फॉलो का करत नाही ? यावर कौशल यांनी उत्तर दिले की, कारण मी लीबिया किंवा येमेनमध्ये फसलेलो नाही. कौशल यांच्या या उत्तरावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, आनंदी वैवाहिक जीवनासाठी, सर्व जोडप्यांनी एकमेकांना फेसबुक आणि ट्विटवर ब्लॉक केले पाहिजे.
कौशल यांना यापूर्वी एका युजरने तुम्ही सुषमा स्वराज यांनी शेवटचे कधी भेटला होतात?, असा प्रश्न केला होता. यावेळी कौशल यांनी त्याला असे उत्तर दिले की त्याची बोलतीच बंद झाली. तुम्ही आरटीआय एक्टिव्हिस्ट आहात का?, असे उत्तर देऊन कौशल यांनी त्याला जशास तसे उत्तर दिले.
