
मुंबई : व्हिडीओ कॉलिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग, अॅनिमिटेड जीआयएफ इमेज यानंतर व्हॉट्सअॅप आता स्टेटस फीचरमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. याबाबत WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार,युझर व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये फोटो आणि व्हिडीओही शेअर करु शकतात. व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये या नव्या फीचरची टेस्टिंगही सुरु झाली आहे.
व्हॉट्सअॅप करणार स्टेटस फीचरमध्ये बदल
हे फीचर आयफोनच्या बीटा व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे. या फीचरमध्ये युझर फोटो किंवा व्हिडीओ क्लिप अपलोड करु शकतात, जे पुढील २४ तास दिसू शकेल. हे फीचर स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रावर आहे. अॅपमध्ये व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरसाठी वेगळा टॅब दिला जाईल. जो सध्याच्या जनरल स्टेटस फीचरपेक्षा वेगळा असेल. हे एक्स्परिमेंटल फीचर स्टेटस टॅब चॅट आणि कॉल्सच्या मध्ये दिले जाईल.
या फीचरसंबंधी WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट शेअर केला असून अॅप स्टोअरवर बीटा युजर २.१७.५ व्हर्जनवर तुम्हाला हे नवे फीचर मिळू शकते. मात्र अधिकृतरित्या हे फीचर लॉन्च न केल्यामुळे या नव्या फीचरसाठी तुम्हाला बीटा टेस्टर व्हावे लागेल.
व्हॉट्सअॅपमध्ये नुकतेच लोकेशन शेअरिंगचे फीचर अॅड झाल्याचे वृत्त होते. WABetaInfo च्या माहितीनुसार, एक मिनिट, २ मिनिटे, ५ मिनिटे किंवा अनिश्चित काळासाठी लोकेशनची माहिती घेतली जाऊ शकते, असे फीचर कंपनी लवकरच आणण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच मेसेज ‘अनसेंड’ आणि ‘एडिट’ करण्याचा ऑप्शन व्हॉट्सअॅप उपलब्ध होऊ शकतो, असे देखील वृत्त होते.
