पाकिस्तानातला धमाका


पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या सेहवान या शहरालगत असलेल्या एका मशिदीत झालेल्या भीषण बॉंबस्फोटात किमान १०० लोक ठार झाले तर २०० पेक्षाही अधिक लोक जखमी झाले. स्फोट झालेली जागा फारच कोंदट अअसून चारीही बाजूंनी बंद आहे. त्यामुळे लोकांना स्फोटाचा आवाज ऐकून पळताही आले नाही आणि जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी रुग्णवाहिकांना आत येताही आले नाही. त्यामुळे मृतांची संख्या तर वाढलीच पण जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही. हे गाव एवढे सुदूर आहे की, तिथून जवळ चांगली रुग्णालयेही नाहीत. सर्वात जवळचे मोठे रुग्णालय तिथून ७० किलो मीटर अंतरावर आहे. पाकिस्तानसारख्या मागास देशात असे प्रकार घडतात तेव्हा मृतांची संख्या जास्त होते ती याचमुळे होय.

हा स्फोट एका सुफी संताच्या समाधीवर उभारण्यात आलेल्या दर्ग्यात झाला आहे आणि त्याची जबाबदारी जगात सध्या मोठा आकांत निर्माण करणार्‍या आयसिस या संघटनेने स्वीकारली आहे. स्फोट करणारे अतिरेकी इस्लामच्याच नावावर हे सारे प्रकार करीत आहेत आणि मुस्लिमांचेच जीव घेत आहेत. मग हा काय प्रकार आहे असा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की इस्लाममधील सूफी पंथ हा हिंदूंना जवळचा आहे. भारतातले कित्येक हिंदू सूफी संतांच्या दर्ग्यातल्या उर्समध्ये सहभागी होत असतात. कट्टर मुस्लिमांच्या मनात अशा पंथाविषयी द्वेष असल्यास नवल ते काय ? मुळात आयसिस सारख्या धर्मवेडांच्या संघटनांना इस्लाममधील अहमदीया आणि शिया पंथांविषयी परभावच आहे. या दोन पंथांचे लोक मुळात मुस्लिम नाहीत. त्यांना मारले पाहिजे अशी शिकवण कट्टरतावादी देत असतात.

या पूर्वीही पाकिस्तानात अशाच रितीने सूफी संतांच्या दर्ग्यात असे स्फोट घडवण्यात आले आहेत. पाकिस्तानात हिंसाचाराच्या घटना नित्य घडत असतात पण गेल्या काही वर्षात त्यांत वाढ झाली आहे. क्वेट्टा येथे दोन वर्षांपूर्वी एक शाळेत स्फोट झाला होता आणि त्यात १५० विद्यार्थी मारले गेले होते. बलुचिस्तानातल्या संत सूफी नूरानी यांच्या दर्ग्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या अशाच स्फोटात ५२ लोक मारले गेले होते. पाकिस्तानात गेला आठवडा अशाच प्रकारांनी गाजला आहे. गेल्या सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी असे तीन दिवस सलगपणे अशा प्रकारात काही लोकांचे जीव गेले आहेत. त्यात दोन पोलीस अधिकार्‍यांचाही समावेश आहे.

Leave a Comment