नवी अंतराळ समस्या


आपल्या देशातले एव्हरेस्ट शिखर गाठणे हे मोठे कठीण काम होते. विसाव्या शतकाच्या पाच दशकांनंतर म्हणजे १९५३ साली या सर्वोच्च शिखरावर पहिले मानवी पाऊल पडले. तोपर्यंत हे शिखर अनुल्लंघ्य समजले जात होते पण आता लोकांनी पर्वतारोहणाचे तंत्र विकसित केले आहे आणि जगभरातले शेकडो तरुण या शिखरावर पाय रोवायला लागले आहेत. अशा शिखरांवर आधी लोक दिसत नव्हते पण आता ते दिसायला लागले आहेत आणि तिथे आल्यानंतर आपल्या आगमनाच्या खुणा ठेवून जायला लागले आहेत. परिणामी एव्हरेस्ट शिखरावर अन्यही पर्यटन स्थळाप्रमाणे पर्यटकांनी केलेला कचरा साठून पर्यावरणाचा र्‍हास व्हायला लागला आहे. आपण पंचवीस वर्षांपूर्वी अशी काही समस्या निर्माण होईल अशी कल्पनाही केली नसेल. मानवाने प्रगती केली आणि प्रगतीने अशा समस्या वाढायला लागल्या.

अंतराळातही अशीच एक समस्या आता आकाराला येत आहे. आपल्या भवताली किती मोठे अवकाश पसरले आहे. त्याचे मोजमापही आपल्याला करता येत नाही. पण या अमर्याद अंतराळालाही गर्दीची आणि कचर्‍याची समस्या ग्रासायला लागली आहे. एव्हरेस्ट शिखरावरची समस्या आपल्याला जाणवत नाही तशीच अंतराळातली हीही समस्या आपल्याला थेट जाणवण्याचे काही कारण नाही पण आता काही अंतराळ संशोधक तिचा विचार करायला लागले आहेत. हा कचरा आहे अंतराळात सोडलेल्या उपग्रहांचा. आजवर नाही म्हटले तरी हजारो उपग्रह अंतराळात सोडण्यात आले आहेत. यातल्या प्रत्येक उपग्रहाचा कालावधी ठरलेला असतो. तो संपला की त्याचे काम संपते. त्याचा उपयोग संपतो. पण तो उपग्रह अवकाशात फिरत राहतो. तो काही खाली पडत नाही. एकामागे एक असे अनेक उपग्रह सोडले जातात आणि कालांतराने ते निरुपयोगी होऊन फिरत राहतात.

सोडल्या जाणार्‍या नव्या उपग्रहांना यातले काही निरुपयोगी उपग्रह धडकण्याची शक्यता असते. आता भारताच्या इस्रो या संघटनेने एकदम १०४ उपग्रह सोंडले. एवढे उपग्रह सोडताना ते एकमेकांवर आदळण्याची शक्यता नसते का असा प्रश्‍न शास्त्रज्ञांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी सांगितले की, सोडल्या जाणार्‍या सगळ्या उपग्रहांवर खालून नियंत्रण ठेवले जाते. त्यांचे रॉकेटपासून विलग होण्याचे वेळापत्रक ठरलेले असते. त्यामुळे ते एकमेकावर आदळण्याची भीती नसते. ते आदळू नयेत अशी दक्षता घेतली जाते. मात्र ज्यांंचा उपयोग संपलेला असतो असे कचरा उपग्रह त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने कोणत्याही उपग्रहांवर आदळण्याची भीती असते.

Leave a Comment