धान्य उत्पादनाचा विक्रम


१९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे अन्नधान्याचे उत्पादन ६ कोटी टन होते. अर्थात लोकसंख्येच्या मानाने हे उत्पादन कमी असल्यामुळे भारत देश धान्याच्या बाबतीत परावलंबी होता. आपण परदेशातून धान्य आयात करत होतो आणि आयातीच्या या उद्योगासाठी केंद्रीय मंंत्रिमंडळात अन्न मंत्री नावाचा एक मंत्री नेमलेला असे. हा मंत्री जगभरात फिरून फक्त धान्य मागून आणण्याचे काम करत असे. अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी अनेक देशांतून भारतीयांना धान्य आयात करावे लागत असे. परदेशातून धान्य आल्याशिवाय आपली गुजराण होत नसे. धान्य आयातीत काही अडथळे आले तर लोकांची अन्नान्नदशा होत असे. धान्याच्या साठ्यावर आणि वापरावर अनेक प्रकारचे निर्बंध घातलेले असत. स्वतः अनेक पोती धान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यालाही आपल्या घरात स्वतःच्या गरजेपेक्षा अधिक धान्य साठवण्यास बंदी केलेली असे. लोकांना सगळ्या प्रकारचे धान्य रेशनिंगच्या दुकानावरून घ्यावे लागत असे. लग्न, मुंज आदी घरगुती समारंभातही अधिकाधिक किती लोकांना जेवण घालावे यावरसुध्दा सरकारची बंधने होती.

दोन राज्यांच्यामध्ये धान्याची वाहतूक मुक्तपणे करता येत नव्हती. धान्याच्या टंचाईमुळे फार वाईट अवस्था उद्भवलेली होती. परंतु १९६६ साली हरितक्रांती सुरू झाली. वास्तविक पाहता ही हरितक्रांती फार मर्यादित क्षेत्रात होती. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशाचा पश्‍चिम भाग अशा अडीच राज्यात ही हरिक्रांती झाली होती. परंतु भारताच्या धान्याच्या परावलंबनाचे चित्र या हरितक्रांतीने बदलून टाकले. अडीच राज्यात हरितक्रांती होऊन एवढे चित्र बदलले पण पूर्ण देशातच ती क्रांती झाली असती तर काय चित्र झाले असते? अर्थात, पाण्याची उपलब्धता, प्रगत बियाणे आणि रासायनिक खते यांच्यामुळेच हे शक्य होत असल्यामुळे त्यांच्या उपलब्धतेवर मर्यादा आल्यामुळे पूर्ण देशात हरितक्र्रांती होऊ शकली नाही. मात्र हळूहळू हे लोण पसरत आहे आणि भारताच्या अन्य राज्यातही धान्याचे उत्पादन वाढत चालले आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात आजवरचे विक्रमी म्हणता येईल असे धान्य उत्पादन झालेले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी या देशाचे धान्य उत्पादन ६ कोटी टनाच्या जवळपास होते पण यावर्षी ते २७ कोटी १९ लाख टन एवढे होण्याचा अंदाज आहे. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीपासून देशाचे धान्य उत्पादन चौपटीने वाढले आहे. आता देशामध्ये आपल्या देशाची गरज म्हणून गहू किंवा तांदूळ आयात करावा लागत नाही आणि कोणत्या देशाकडे भीकही मागावी लागत नाही.

या उलट भारतातून धान्ये, फळे, भाज्या इत्यादींची निर्यात होत आहे. जो देश १९७४ सालपर्यंत परदेशातल्या धान्यावर अवलंबून होता आणि धान्य आयात झाल्याशिवाय देशातल्या जनतेला चार घास खायला मिळत नव्हते. त्याच भारत देशातून आता जगातल्या २२ देशांना धान्य निर्यात केले जात आहे. २०१५ साली तर भारत हा तांदळाची निर्यात करणारा पहिल्या क्रमांकाचा देश ठरला होता कारण त्या वर्षी भारताने १ कोटी टन तांंदूळ निर्यात केले होते. त्यातले ४० लाख टन तांदूळ आपण चीनला विकले होते. आपल्या देशाने हरित क्रांती केली असली तरी ती प्रामुख्याने गहू आणि तांदूळ या दोन भरड धान्यातच केलेली आहे. अजूनही आपला देश डाळी आणि तेलबियांच्या बाबतीत पूर्ण स्वावलंबी झालेला नाही. अजूनही आपल्याला परदेशातून डाळी आणाव्या लागतात आणि पाम तेलासाठी आग्नेय आशियातील सिंगापूरसारख्या छोट्या देशावर अवलंबून रहावे लागते.

गतवर्षी तर तुरीच्या बाबतीत फार वाईट अवस्था निर्माण झाली आणि तुरीची डाळ लोकांना परवडणार नाही अशा पातळीवर जाऊन पोहोचली. त्यामुळे यंदा सरकारने तुरीच्या उत्पादनाला बरीच प्रेरणा दिली. जिच्यामुळे या वर्षी मर्यादेपेक्षा अधिकच तूर पिकली असून ती कोठे साठवावी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तूर महाग झाल्यामुळे त्यापासून धडा घेऊन आपण यंदा तूर खूप पिकवली पण तिला जर भाव देऊ शकलो नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा तुरीची टंचाई निर्माण होऊ शकते. तुरीच्या बाबतीत असे समाधानकारक चित्र असले तरी हरभरा, मसूर, उडीद, मूग या डाळींची परिस्थिती म्हणावी तशी नाही. तेव्हा याही डाळींच्या उत्पादनाला गती देण्याची गरज आहे. साखरेच्या उत्पादनात आपण अगदी वरची पातळी गाठली आहे आणि लोकांची गरज भागवण्यासाठी साखरेची आयात करावी लागेल अशी स्थिती गेल्या दहा वर्षात कधीच निर्माण झालेली नाही. या सगळ्या उत्पादनासोबतच कृषीशी निगडित असलेल्या दूध, मांस, अंडी, फळे याही उत्पादनामध्ये आपल्याला बरीच मजल मारायची आहे. त्यातल्या दूध आणि फळांच्या बाबतीत आपण चांगले यश मिळवलेले आहे. परंतु अजून तरी भाज्या, मांस यांची उपलब्धता वाढत नाही. तेव्हा कृषी विकासाचा सर्वांगीण कार्यक्रम हाती घेऊन त्यामध्ये असे काहीतरी करावे लागणार आहे की ज्यामुळे याही कृषी उत्पादनांची उपलब्धता वाढत जाईल. देशात २७ कोटी १९ लाख टन उत्पादन झाले ही गोष्ट समाधानाची असली तरी एवढ्याच उत्पादनावर थांबता येणार नाही. उत्पादन खूप वाढवावे लागणार आहे.

Leave a Comment