नासाशी स्पर्धा


अमेरिकेतील अवकाश संशोधन करणार्‍या संस्थेचे नाव नासा असे आहे. नॅशनल ऍरॉनॉटिक ऍन्ड स्पेस असोसिएशन. नासा ही संस्था जगातली अवकाश संशोधनातली सर्वाधिक प्रगत संस्था मानली जाते. मात्र अमेरिकेच्या या संस्थेला भारताच्या याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या इस्रो या संघटनेने जबरदस्त मात दिली आहे. भारताचे अंतराळ संशोधनातले यश इतके उज्ज्वल आणि विक्रमी आहे की ज्या गोष्टी अमेरिकेच्या नासालाही जमल्या नाहीत त्या भारताच्या इस्रो संघटनेच्या सहज जमल्या आहेत. काल इस्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रम नोंदला. एवढे उपग्रह एकदम अवकाशात सोडणे आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन या प्रगत देशांनाही जमलेले नाही.

भारताच्या रॉकेटने काल १०४ उपग्रह अवकाशात सोडले. त्यात तीन उपग्रह भारताचे आहेत. उर्वरित १०१ उपग्र्रहांपैकी ८८ उपग्रह एकट्या अमेरिकेचे आहेत. उर्वरित १३ उपग्र्रह जर्मनी, इस्रायल, स्वित्झर्लंड, नेदरलँडस्, संयुक्त अरब अमिराती आणि कझाकस्तान या देशांचे आहेत. आजवर एकाच वेळी एवढे उपग्रह सोडण्याचा उपक्रम अन्य कोणत्या देशांनी केलेला नव्हता. आजचे १०४ उपग्र्रह धरून आजपर्यंत इस्रोने १८० उपग्रह अवकाशात सोडले आहेत. त्या १८० पैकी ८६ उपग्रह भारताचे स्वतःचे आहेत आणि उर्वरित उपग्रह २१ देशांचे आहेत. विशेषतः अमेरिकेने भारताच्या अवकाश स्थळावरून आजपर्यंत ९६ उपग्रह सोडले आहेत. अमेरिकेसारख्या सर्वाधिक प्रगत देशाने अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताची अशी मदत घ्यावी ही गोष्ट भारतासाठी अभिमानास्पद आहे.

आज जगात भारताचे या क्षेत्रात फार नाव घेतले जात आहे. कारण दुसर्‍या देशाचे उपग्रह अवकाशात नेऊन सोडण्याच्या बाबतीत इतर कोणीही भारताचा हात धरू शकत नाही. भारताचा अन्य देशांचे उपग्रह अवकाशात सोडून स्थापित करण्याचा दर इतर कोणाही पेक्षा कमी आहे. विशेषतः अमेरिकेच्या तुलनेत विचार केला असता हा दर निम्मासुध्दा नाही. एवढ्या कमी खर्चात भारत देश उपग्र्रह प्रक्षेपित करत असल्यामुळे अमेरिकेलासुध्दा आपले उपग्र्रह भारतातून प्रक्षेपित करावेत असा मोह झाला असल्यास काही नवल नाही. आजवर जगातल्या विविध देशांनी मंगळावर ५१ मोहिमा पाठवल्या. त्यातल्या केवळ २१ मोहिमा यशस्वी झाल्या. भारताची मात्र पहिलीच मंगळ मोहीम यशस्वी ठरली आहे.

Leave a Comment