यंदाच्या वर्षात साखर संकटाचा धोका


यंदाच्या वर्षात देशात मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन घटण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे यंदा साखर टंचाईबरोबरच साखरेच्या दरवाढीलाही सामोरे जावे लागेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी सरकारला अगोदरच साखर आयातीसंदर्भातला निर्णय घेणे भाग पडेल असेही सांगितले जात आहे. देशातील साखरेची मागणी पुरी करण्यासाठी किमान १५ लाख टन साखर आयात करावी लागेल असे ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल विथलोनी यांनी सांगितले.

यंदा देशात साखर उत्पादन घटले असून साधारण २.२५ कोटी टन उत्पादन येईल असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र साखर ट्रेडर्सच्या म्हणण्यानुसार हे उत्पादन २ कोटी टनांपर्यंत असेल. मागील स्टॉक ७७ लाख टनांचा आहे. तरीही २०१७ मध्ये साखर आयात करावी लागेल व त्याचा निर्णय एप्रिलमध्येच सरकारला घ्यावा लागेल. साखर हा देशाच्या राजकीय व आर्थिक दृष्टीने संवेदनशील मुद्दा मानला जातो. त्यामुळे आयात करताना सरकार आयात शुल्क रद्द करण्याचीही शक्यता आहे. सध्या हे शुल्क ४० टक्के इतके आहे.

साखर आयात करायची झाली तर दुबई व थायलंडला प्राधान्य दिले जाईल असेही समजते. देशात दरवर्षी २.४५ कोटी टन साखरेची मागणी असते.

Leave a Comment