माहिती तंत्रज्ञ लक्ष्य


सीरिया आणि इराकमध्ये कार्यरत असलेल्या जगातल्या सध्याच्या सर्वाधिक हिंसाचारी संघटनेने, आयसीसने आता महाराष्ट्राला आपले लक्ष्य बनवले आहे. आयसीसच्या कारवाया महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतातच पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न जारी आहे. मात्र त्यात माहिती तंत्रज्ञानाच्या अडचणी आहेत असे त्यांना जाणवत आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील १५० संगणक अभियंत्यांची हत्या करण्याचा कट रचला आहे. या कटाची व्याप्ती आणि परिणाम विचारात घेतल्यानंतर अंगावर काटा येतो. या १५० संगणक अभियंत्यांची यादी आयसीसच्या हस्तकाकडे सापडली आहे. तिच्यामध्ये ७० संगणक अभियंते मुंबईतले आहेत. आयसीसची ही यादी पाहिल्यानंतर आयसीसच्या कारवायामध्ये भारतातल्या संगणक क्षेत्राची अडचण कशी होत असेल याचा अंदाज येतो.

आयसीसच्या कारवाया महाराष्ट्रात म्हणाव्या तशा पसरल्या नाहीत. मुंबईजवळील कल्याणचे काही तरुण आयसीसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियाकडे पळून गेल्याचे मध्यंतरी समजले होते. पण तरीही महाराष्ट्रात या संघटनेने फार हातपाय पसरलेले नसावेत असा अंदाज होता. मात्र गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात मराठवाड्यात परभणी आणि हिंगोली येथे आयसीसच्या चौघा समर्थकांना अटक करण्यात आली होती. त्या चौघांचा तपास केला असता आयसीसने आपली व्याप्ती वाढवण्याचे केंद्र म्हणून मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे लक्षात आले. या चौघांची कसून तपासणी केली असता बर्‍याच नव्या गोष्टी समजल्या. आयसीसचे जाळे विणताना माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि आयसीसतर्फे त्यांच्या हस्तकांना इंटरनेटद्वारे संदेश पाठवले जातात. हे संदेश गोपनीय असतात असा आयसीसच्या नेत्यांचा विश्‍वास होता. पण तो फोल ठरला.

महाराष्ट्रातले संगणक अभियंत्यांनी आयसीसची संकेतस्थळे हॅक करून त्याच्यावरून संदेशांचे डिकोडिंग केले आणि आयसीसच्या कारवाया उघड केल्या. तेव्हापासून आयसीसच्या मनामध्ये संगणक अभियंत्यांविषयी तिडिक निर्माण झाली आहे. या संगणक अभियंत्यांना जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत आपल्या कारवायांचे आणि जाळे विस्तारित करण्याचे काम कधीच व्यवस्थित होऊ शकणार नाही. हे आयसीसच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांनी या संगणक अभियंत्यांना टार्गेट केले आहे. आता १५० जणांची यादी हाती आली आहे. त्या सर्वांना संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

Leave a Comment