पानांची सळसळ; उर्जेचा स्रोत


आपल्या सभोवताली ऊर्जा निर्मितीचे अनेक स्रोत पसरलेले असतात. परंतु त्यातला उर्जेचा नेमका खेळ तंत्रज्ञांना पुरता कळलेला नसतो. जेव्हा तो कळतो तेव्हा त्यातूनही वीज निर्मिती करण्याची कल्पना त्यांच्या मनात साकार व्हायला लागते. वारा, ऊन आणि पाणी यांचा वापर करून वीज तयार केली जात आहेच. परंतु समुद्राच्या लाटा हासुध्दा उर्जेचा स्रोत होऊ शकतो असे लक्षात आल्यामुळे समुद्राच्या लाटांपासूनही वीज निर्माण करण्याचे प्रयत्न जारी आहेत. आता शास्त्राज्ञांनी उर्जेचे आणखी दोन स्रोत नव्याने उघड केले आहेत. त्यातला पहिला स्रोत आहे झाडे आणि दुसरा आहे वनस्पतीत अन्न तयार करण्याची प्रक्रिया. वनस्पतीमध्ये असलेले हरितद्रव्य, सूर्यप्रकाश आणि पाणी यांचा वापर करून अन्न तयार केले जाते. ही एक प्रकारची निर्मिती आहे आणि तिच्यासाठी हे तीन घटक वापरले जातात. त्याअर्थी या निर्मितीत कोठेतरी उर्जेचा वापर होतच असणार. तेव्हा हीच ऊर्जा आपण हस्तगत करू शकू.

अशाच प्रकारचा ऊर्जा स्रोत म्हणजे झाडे. झाड हे एक अद्भूत यंत्र आहे. झाडांची मुळे ५०-५० फूट खोलवर पसरलेली असतात आणि त्यातली तिय्यम मुळे जमिनीतले पाणी ओढून घेऊन ते वर पास करत असतात. तेव्हा ५० फूट खोलावरून घेतलेले हे पाणी जमिनीपासून ५० फूट वरपर्यंत ओढून घेतले जाते. या प्रक्रियेत कोठेही ऊर्जा न वापरता पाणी १०० फूट वाटचाल करते. याचा अर्थ झाडांच्या अंगामध्ये मोटारपंपासारखी ताकद आहे. याच पध्दतीने झाडांच्या पानांची सळसळ हासुध्दा एक ऊर्जा स्रोत होऊ शकतो. म्हणून पानांच्या सळसळीपासून वीज निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न काही लोकांनी केला आहे.

अमेरिकेच्या आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी पानांच्या सळसळीतून वीज तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी कृत्रिम झाड विकसित केले आहे. हे झाड मेटालिक ट्रेलिसचा वापर करून तयार केले असून त्या पानांवर एक विशिष्ट आवरण चढवलेले आहे. ही पाने निसर्गातल्या खर्‍या पानांसारखी दिसतात. परंतु वार्‍याने ती पाने सळसळ कराययला लागली की त्यातून वीज तयार होते. या तंत्रज्ञानाला पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट असे म्हटले जाते. माणूस सध्या उर्जेच्या शोधात फिरत आहे. कारण त्याची जीवनपध्दती बदलली असून तो हरघडी कसल्या ना कसल्या उर्जेचा वापर करून जीवन व्यतित करायला लागला आहे. त्यामुळे प्रचंड ऊर्जा ही त्याची गरज झालेली आहे आणि या गरजेतून ऊर्जा निर्मितीचे विविध स्रोत शोधले जात आहेत.

Leave a Comment