टाटा सन्सच्या संचालक मंडळातूनही सायरस मिस्त्रींना हटविले


मुंबई – टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांची कंपनीच्या संचालक मंडळातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी कंपनीच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. याप्रसंगी रतन टाटा, एन. चंद्रशेखरन, अजय पिरामल यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते.

टाटा समूहातील दुसरे मोठे हिस्सेदार असलेल्या शापूरजी पालनजी समूहाला यामुळे दहा वर्षांनंतर प्रथमच संचालक मंडळावरील प्रतिनिधत्व गमवावे लागले आहे. टाटा सन्समध्ये मिस्त्री परिवाराची 18.5 टक्के हिस्सेदारी आहे.

दरम्यान, टाटा सन्सला विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) घेण्यास मनाई करावी, अशी मागणी मागील महिन्यात मिस्त्री यांनी केली होती. मात्र, राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने ती फेटाळली होती.

अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर मिस्त्री यांनी टाटा समूहावर अनेक आरोप करत आव्हान दिले होते. तसेच सेबीमध्येही तक्रार दिली होती. मात्र, सेबीने मिस्त्रींची तक्रार फेटाळत टाटा समूहाला क्लिन चिट दिली होती.

Leave a Comment