अण्णांची कैफियत


समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातला गेल्या १०-१२ वर्षांतला सर्वाधिक मोठा म्हणता येईल असा भ्रष्टाचार उघड्यावर आणण्याचा चंग बांधला असून त्या दिशेने सक्रिय पावले टाकायला सुरूवात केली आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांपैकी तोट्यात गेलेल्या साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली आणि त्या विक्रीमध्ये काही राजकीय पुढार्‍यांनी अब्जावधी रुपयांचा मलिदा मिळवला असा अण्णांचा आरोप आहे. गेल्या काही वर्षात साखर कारखाने तोट्यात येत गेले. कारखाना तोट्यात आला की तो दिवाळ्यात निघतो. कारखान्याने घेतलेली कर्जे फिटत नाहीत. मग ती कर्ज देणार्‍या संस्था कारखान्याचा लिलाव मांडतात. त्या लिलावातून आलेल्या पैशातून कारखान्याची कर्जे बेबाक केली जातात. मात्र असे हे लिलाव होत असताना काही ठराविक कंपन्या आणि व्यापारीच त्या लिलावात उतरतात. आता एखादा सहकारी साखर कारखाना लिलावात विकत घेणे ही काही सामान्य गोष्ट नाही. तेव्हा एक कारखाने विकत घेणारे व्यापारी ठराविकच असणार हे उघड आहे.

असे हे ठराविक लोक कारखान्याचा लिलाव पुकारला जातो. तेव्हा जो व्यापारी जास्त बोली लावेल त्याने लावलेल्या बोलीलाच तो कारखाना विकला जाणार हे उघड आहे. मात्र हे सगळे व्यापारी स्वतः कारखाना विकत घेत नाहीत. ते काही पुढार्‍यांच्या वतीने कारखाने घेतात. म्हणजे कारखाना विकत घेणारा व्यापारी आपल्याला दिसतो वेगळाच परंतु तो कोणा तरी पुढार्‍यासाठी म्हणून कारखाना विकत घेत असतो. त्यात त्या पुढार्‍याचा पैसा गुंतलेला असतो आणि १००-१०० कोटी रुपयांची मालमत्ता असलेले साखर कारखाने हे व्यापारी आणि पुढारी मिळून १५-२० कोटीला विकत घेतात. खासदार राजू शेट्टी यांनीसुध्दा असाच आरोप करून एक याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी या लिलावातील भ्रष्टाचाराचे उदाहरण म्हणून ६ साखर कारखान्यांची आकडेवारी दिलेली आहे. त्यातल्या चार कारखान्यांची मालमत्ता प्रत्येकी १०० कोटी रुपयांची होती. तर दोन कारखान्यांची मालमत्ता ही ७० कोटी रुपयांची होती. मात्र व्यापारी आणि पुढारी यांनी संगनमत करून लिलावात या कारखान्याच्या किंमती फार वाढू दिल्या नाहीत. यातले दोन साखर कारखाने ४०-४५ कोटी रुपयांना विकले गेले. ७० कोटी रुपयांची मालमत्ता असलेले कारखाने १३ कोटीला विकले गेले. त्यातला एक १०० कोटींचा कारखाना तर केवळ १५ कोटी रुपयांना गेला आणि एक कारखाना ३० कोटी रुपयांना गेला.

या प्रकरणामध्ये साखर कारखाने काढणारे पुढारी, ते कारखाने तोट्यात आणणारे पुढारी, लिलाव पुकारण्यास प्रोत्साहन देणारे नेते आणि कारखाने खरेदी करणारे साखर सम्राट यांचे एक रॅकेट तयार झालेले आहे, असा अण्णा हजारे आणि राजू शेट्टी या दोघांचाही आरोप आहे. मात्र या दोघांनी केलेल्या दाव्यांमध्ये बरेच अंतर आहे. अण्णा हजारे यांच्यामते हा सारा भ्रष्टाचार २५ हजार कोटी रुपयांचा आहे. तर राजू शेट्टी यांना तो साडेतीन हजार कोटींचा असल्याचे वाटते. या दोघांचा हेतू सारखाच आहे. परंतु अण्णा हजारे कधीही फार खोलात जाऊन चौकशी करत नाहीत आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि ऐकीव माहितीवरून अशा प्रकारचे दावे दाखल करतात. त्यांचा हेतू चांगला असतो परंतु ज्या तयारीने या मैदानात उतरले पाहिजे त्या तयारीने ते उतरत नाहीत. या ठिकाणी त्यांनी साखर कारखान्यांची मालमत्ता किती रुपयांची गृहित धरली आहे आणि हा कारखाना लिलावात किती रुपयांना जायला हवा होता याचे कोणालाही पटेल याचे आकडे सयुक्तिकपणे सादर करायला हवे होते. परंतु त्यांच्याकडे ते तसे नसल्यामुळे ते असा मोठा संदिग्ध आकडा सांगत आहेत.

अण्णा हजारे यांनी शरद पवार, अजित पवार, नितीन गडकरी यांच्यापासून ते विविध पक्षांच्या अनेक नेत्यांपर्यंत सर्वांना या प्रकरणात गोवलेले आहे. अण्णांनी या प्रकरणात आपलेही नाव घेतले आहे हे शरद पवार यांना कळले तेव्हा त्यांनी अण्णांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची घोषणा केली. राजू शेट्टी यांच्या याचिकेत मात्र पवारांचे नाव नाही. जे सहकारी साखर सम्राट कारखाना नीट चालवू शकत नाहीत आणि ज्यांच्यामुळे हे कारखाने तोट्यात जातात त्यांचेच हस्तक असलेले व्यापारी कारखाने विकत घेतात आणि खासगी कारखाने म्हणून चालवतात. तेव्हा मात्र ते कारखाने फायद्यात चालतात. याचा अर्थ ते कारखाने फायद्यात चालण्याच्या स्थितीत असतात परंतु सहकार क्षेत्रातील स्वाहाकारी वृत्तीमुळे ते तोट्यात जातात आणि जे लोक त्या कारखान्याला सहकारी म्हणून चालवू शकत नाहीत मात्र तेच खासगी म्हणून मात्र छान चालवू शकतात. या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार लपलेला आहे. मात्र तो सिध्द करणे मोठे अवघड जाणारे आहे. मुळात जे व्यापारी हे कारखाने विकत घेतात ते कोणातरी पुढार्‍याचे हस्तक असतात हे सिध्द करणेच अवघड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारखान्याची खरी मालमत्ता आणि लिलावात त्याला येणे अपेक्षित असलेली किंमत याचे आकडे सिध्द करणे त्यापेक्षा अधिक अवघड आहे. मात्र अण्णा हजारे यांनी हे शिवधनुष्य हाती घेतले आहे हे खरे.

Leave a Comment