हाफिझ सईदची अटक


आंतरराष्ट्रीय राजकारणाची काही तत्त्वे असतात. या राजकारणात त्यांनाच किंमत असते ज्यांच्या हातात काही ताकद आहे. या राजकारणात आपण शांततेेचा घोष केला तरीही जोपर्यंत आपल्या हातात ताकद नाही तोपर्यंत आपला तो शांततेचा घोषही कोणी लक्ष देऊन ऐकत नाही. हातात ताकद नसेल तर आपण कोणाचे नाक दाबून तोंडही उघडू शकत नाही. या राजकारणात दुबळ्यांना कोणी विचारीत नाही. २००८ साली पाकिस्तानातल्या अतिरेकी संघटनांनी मुंबईवर हल्ला केला होता. हा हल्ला करणार्‍या दहशत वाद्यांनी दोन कोटींच्या मुुंबईला ७२ तास वेठीस धरले होते आणि १६२ लोकांना मारले होते. या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानी अतिरेकी हाफीज सईद हा होता.

त्याच्यावर पाकिस्तानी सरकारने कारवाई करावी अशी मागणी भारत सरकारने अनेक वेळा केली पण पाकिस्तानी सरकारने प्रत्येक वेळी ही मागणी फेटाळून तरी लावली किंवा फारच दबाव आल्यावर कारवाईचे नाटक करून सर्वांसमोर चांगुलपणाचा देखावा केला पण आता अमेरिकेत अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे नाक दाबले आहे. खरे तर ते अजून दाबलेले नाही पण आपण पाकिस्तानचे नाक दाबू शकतो असे केवळ सूचित केले आहे. तेवढ्याच इशार्‍याने पाकिस्तानी सरकार एवढे हादरले आहे की त्याने कोणीही सांगितलेले नसताना हाफीज सईदला स्थानबद्ध केले आहे. तशी मागणी अमेरिकेने केलेली नव्हती पण आता अमेरिकेकडून तशी मागणी येणार असे संकेत पाकिस्तानला मिळायला लागले होते.

ट्रम्प यांनी पश्‍चिम आशियातल्या सात मुस्लिम देशांतल्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश देणार नाही असे जाहीर केले. त्यात न्यायालयाचा अडसर आला हे खरे पण ट्रम्पशाहीच्या धोरणांचा रोख पाकिस्तानला कळला. या सात राष्ट्रांच्या पाठोपाठ पाकिस्तानचाही क्रमांक कधीही लागू शकतो असे केवळ सूचित झाले आहे. पण एवढ्या सूचनेनेही पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून आहे. अमेरिकेचा डिमांड ड्राफ्ट हेच पाकिस्तानचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. तेव्हा अमेरिका आपले तोंड उघडण्यासाठी आपले नाक कधीही दाबू शकते हे पाकिस्तानला लक्षात आले आहे. तशी वेळ आल्यास आपल्याला अमेरिकेच्या अनेक मागण्या मान्य कराव्या लागतील हेही पाकिस्तानच्या लक्षात आले आहे. हाफीज सईदला अटक करणे हा त्या मागण्या मान्य करण्याचाच एक भाग आहे.

Leave a Comment