दिलासादायक


केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७-१८ या वर्षाचा सर्वसाधारण आणि रेल्वेचा असे दोन अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंकल्पावर नजर टाकली असता त्यांच्या संबंधात आधी व्यक्त झालेल्या बहुतेक अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे लक्षात येते. विशेषतः सर्वांच्या नजरा ज्या आयकराच्या तरतुदींकडे लागल्या होत्या. त्या तरतुदीच्या संबंधातील सर्व अपेक्षा या अर्थसंकल्पात पूर्ण झालेल्या दिसत आहेत. या पुढे आयकरपात्र उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपये एवढी असेल. ही मर्यादा ५० हजारांनी वाढवण्यात आली आहे. उत्पन्नाच्या सर्वात शेवटच्या स्लॅबला पूर्वी १० टक्के कर लागत असे. तो आता पाच टक्के करण्यात आला आहे. त्यानंतरचा स्लॅब म्हणजे ५ लाखांपासून १० लाखांपर्यंतच्या स्लॅबवर पूर्वी इतकाच २० टक्के कर लागू राहणार आहे. म्हणजे उच्चमध्यमवर्गाला काही सवलत मिळालेली नाही. सर्वसामान्य करदात्याला मात्र ५० टक्के दिलासा मिळाला आहे. या दिलाशामुळे सरकारचे २२ हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. ते भरून काढण्यासाठी उच्चउत्पन्न गटांवर सरचार्ज लावला जाणार आहे.

अशा रितीने आयकराच्या संबंधातील अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. ५ टक्के कर हा काही फार नाही. त्यामुळे तो बुडवू नये असे कोणालाही वाटणारच. याचा अर्थ करांच्या कक्षेमध्ये अधिक लोक येणार आहेत. ज्यांना या कक्षेत यायचे आहे परंतु आपल्या पूर्वीच्या उत्पन्नाची चौकशी होऊ नये असे वाटते त्यांना त्या चौकशीतून मुक्त करण्यात आले आहे. सरकारचे उत्पन्न २१ लाख ४७ हजार कोटी इतके अपेक्षित आहे. ते वास्तविक पाहता ४० लाख कोटी रुपये असायला पाहिजे असे अर्थतज्ञांचे मत असते. मात्र त्यासाठी अधिकाधिक करदात्यांना करांच्या कक्षेत खेचणे आवश्यक असते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्या दिशेने नक्कीच काही पावले टाकली आहेत. यापुढे बँकेतल्या नगदी व्यवहारांवर एक नाममात्र का होईना पण कर लागेल असे वाटले होते पण तसे झाले नाही. कारण त्यामुळे बँकांच्या मार्फत व्यवहार करणार्‍यांना कराचा भुर्दंड भरावा लागतो अशी भावना तयार झाली असती. त्या ऐवजी जे लोक बँकेच्या माध्यमातून किंवा डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करत नाहीत त्यांच्यावर कर बसवण्याचा अर्थमंत्र्यांनी प्रयत्न केला आहे. यापुढे आयकर बुडवू इच्छिणार्‍यांना तो शक्यतो बुडवता येणार नाही. या दिशेने अथमर्ंत्र्यांनी रणनीती आखलेली दिसत आहे.

अर्थमंत्र्यांनी केलेल्या प्रतिपादनानुसार आपल्या देशात आयकरपात्र उत्पन्न असणार्‍यांची संख्या फार मोठी आहे. पण त्यातले फार कमी लोक आयकर भरतात. अर्थमंत्र्यांच्या भाषणात अशा कर बुडवणार्‍या लोकांचे नेमके आकडे समोर आले. अनेक लोक कर भरत नाहीत. मात्र प्रामाणिकपणे कर भरणार्‍यांना तो बुडवता येत नाही. म्हणजे सरकारच्या उत्पन्नाची भरती करण्याची जबाबदारी प्रामाणिक लोकांवरच येऊन पडते. म्हणून अशा लोकांना अर्थमंत्र्यांनी करसवलती दिल्या आहेत. ५० लाखांपेक्षा कमी नफा कमवणार्‍या छोट्या कंपन्यांचा कंपनी कर ३० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ही सवलत घेणार्‍या उद्योजकांची संख्या एकूण उद्योजकांमध्ये ९४ टक्के एवढी आहे. म्हणजे सरकारने रोजगार निर्मिती करणार्‍या छोट्या उद्योगांना ही एक चांगली सवलत दिलेली आहे. सरकारने आपल्या उत्पन्नातून १० लाख कोटी रुपये हे शेती कर्जासाठी उपलब्ध करून दिले आहेत. ग्रामीण भागातल्या विविध योजना म्हणजे ग्रामीण गृहनिर्माण, मनरेगा आणि ग्रामीण भागातील सडका यांच्यासाठी १ लाख ८२ हजार कोटी रुपये एवढे राखून ठेवलेले आहेत.

अर्थमंत्र्यांनी असा ग्रामीण भागावर भर दिला असला तरी इ.स. २०२२ सालपर्यंतत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा निर्धार अजून तरी संदिग्धच वाटत आहे. त्या दिशेने सरकारचे एखादे निश्‍चित स्वरूपाचे पाऊल या अंदाजपत्रकात तरी पडलेले दिसत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना दुप्पट श्रीमंत करणे ही एक संदिग्ध घोषणाच राहते की असे वाटायला लागले आहे. सरकारने या अंदाज पत्रकामध्ये कौशल्य विकास आणि उच्चशिक्षण यावरही विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. विशेषतः भारतातील वैद्यकीय महाविद्यालये देशाची वैद्यकीय सेवेची गरज पुरी करण्यास अपुरे पडू नयेत म्हणून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणामध्ये उपल्बध जागांत २५ हजारांची वाढ करण्याचे ठरवले आहे. सरकारला या वर्षी कराच्या उत्पन्नातून गतवर्षीच्या मानाने १७.५ टक्के एवढे जादा उत्पन्न झालेेले आहे. या वाढलेल्या उत्पन्नाचा एक निश्‍चित भाग विद्यार्थी आणि युवकांवर खर्च करण्याचे सरकारने ठरवले असून उच्चशिक्षणासाठी नव्या योजना आणि जादा तरतुदी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांच्या देणग्या घेण्यामध्ये अधिक पारदर्शकपणा यावा यादृष्टीने काही तरतुदी केल्या आहेत आणि त्यांच्या अनुरोधाने लोक प्रतिनिधित्व कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या अंदाजपत्रकात ज्येष्ठ नागरिकांनाही काही चांगल्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न झालेला दिसत आहे.

Leave a Comment