हत्या टाळता आली असती


पुण्यातल्या इन्फोसिस कंपनीतली आय. टी. इंजिनियर रसिला राजू हिची तिथल्याच सुरक्षा रक्षकाने वायरने गळा आवळून हत्या केली. आय.टी. कंपन्यातल्या महिलांच्या अशा हत्यांचा प्रश्‍न नेहमीच चर्चेला येेत असतो. शेवटी कोणतीही हत्या ही दुर्दैवीच असते यात काही शंका नाही पण वारंवार होणार्‍या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की ही हत्या टाळता आली असती. महिला कर्मचारी काम करीत असताना त्यांच्या सुरक्षेचा बारकाईने विचार केला असता हे तीव्रतेने जाणवते. रसिला राजू हिच्याच बाबतीत पोलीस तपास सुरू आहे आणि या तपासात अशा काही गोष्टी आढळायला लागल्या आहेत की तिचा खून नक्कीच टाळता आला असता. ती रविवारची साप्ताहिक सुटी असूनही काम करीत होती. ही पहिली चूक आहे.

तिला त्या दिवशी काम करण्यावाचून काही पर्यायच नव्हता म्हणूनच ती काम करीत होती असे आता सांगितले जाईल पण ते खरे मानले तरीही तिला ते काम करताना आपल्या सेक्शनमध्ये एकटेेच वावरावे लागत होते. महिला कर्मचार्‍यांना अशा रितीने एकाकीपणे काम करावे लागू नये यासाठी कधीही त्यांच्या सोबत दुसरी महिला कर्मचारी असावी असा नियम आहे. पण रसिला राजू हिच्याबाबतीत हा नियम पाळण्यात आलेला नव्हता. तिच्या कामाचे स्वरूपच असे स्पेशल होते की तिच्यासोबत दुसरी महिला कर्मचारी उपलब्ध होऊ शकली नसेल. हेही समर्थन आपण मान्य केले तरीही त्या सेक्शनमध्ये ज्याला काम नाही असा दुसरा त्या सेक्शनचा वरिष्ठ कर्मचारी हजर असायला हवा होता पण तशी दक्षता घेण्यात आली नव्हती|

या प्रकरणातला आरोपी सैकिया याला रसिलाने सतत टक लावून पाहिल्याबद्दल झापले त्यावर तो बाहेर गेला आणि काही क्षणात आता तिचा खून करायचाच या इराद्याने आत आला. तो सुरक्षा कर्मचारी होता. त्याला कोणत्याही सेेक्शनमध्ये येण्याचा काही अधिकार नाही. पण तो संगणकावर काही तरी नोंद करायची आहे असे सांगून आत आला. त्याचा संगणकाशी काहीही संबंध येत नाही. पण त्याने तसा बहाणा सांगून आत प्रवेश केला. याही ठिकाणी त्याला आत येण्यास प्रतिबंध करणारा नियम आहे पण या नियमाची अंमल बजावणी नीट करण्यात आली नाही. एकंदरित आय टी कंपनी असो की, तेलाची गिरणी असो. नियम तर खूप केलेले असतात पण कधीच काही विपरीत घडत नाही असे दिसायला लागले की, नियमांच्या बाबतीत ढिलेपणा केला जातो. तसा तो येथेही झाला आहे. तसा तो झाला नसता तर रसिला राजूची हत्या टळली असती.

Leave a Comment