सुरक्षिततेचा अभाव


लातूर येथील एका ऑईल मिलच्या टाकीची सफाई चालू असताना त्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे गुदमरून ९ कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर ती दाबण्याचा बराच प्रयत्न झाला. मात्र मरण पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्यामुळे ही गोष्ट उघड झाली आणि आता सर्वांना ती कळून चुकली आहे. ही घटना घडल्यानंतर तिला जबाबदार असणार्‍या मिलच्या मालकाला आणि संबंधित अधिकार्‍यांना ताबडतोब अटक होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी होती परंतु घटना उघड झाल्यानंतरही जवळजवळ पूर्ण दिवसभर त्यांच्याविरोधात साधा गुन्हासुध्दा नोंदला गेला नाही. आता मात्र या वायूबाधेची बातमी पूर्ण देशाला कळली त्यामुळे स्थानिक पोलिसांनी सावध होऊन मिलच्या मालकाला अटक केली आहे.

या मिलच्या टाक्यांची सफाई करताना नेहमीच सुरक्षिततेच्या सगळ्या उपाययोजनांची पायमल्ली केली जाते असे अनेकदा दिसून आले आहे. परंतु कोणत्याही कारखान्यामध्ये सुरक्षेचे उपाय योजिले जातात की नाही यावर नजर ठेवण्याची जबाबदारी ज्या अधिकार्‍यांची असते त्या अधिकार्‍यांनी या मिलच्या मालकाला कधीच त्याची जाणीव दिली नाही. आता मात्र ही सारी हेळसांड उघड झाली आहे. आता मिल मालकाबरोबरच उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाई होण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक कायदे केलेले असतात परंतु त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही. उपाययोजनांच्या अभावी काम चालू ठेवले जाते मात्र जेव्हा असा मोठा अपघात होतो तेव्हाच सर्वांचे डोळे उघडतात आणि मग सर्वांना नियमांची आठवण होते.

अशा प्रकारच्या अपघातांविरुध्द कारवाई झाली तरी कालांतराने सर्वांनाच त्याचा विसर पडतो आणि मरण पावलेल्या कामगारांच्या कुटुंबांना मदत मिळते की नाही याकडे कोणाचे लक्ष नसते. सर्वांनाच विसर पडल्यामुळे असे मिल मालक आपल्या नफ्यासाठी मरण पावलेल्या या कामगारांच्या कुटुंबांना वार्‍यावर सोडतात. असे होऊ नये यासाठी कामगार संघटना आणि सामाजिक संघटनांनी या पुढच्या कारवाईवरसुध्दा लक्ष ठेवले पाहिजे. त्या कामगारांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर होऊन ती त्यांच्या पदरात पडेपर्यंत सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे.

Leave a Comment