पोपटाला शोधण्यासाठी 25 हजारांचे ईनाम


हौसेला मोल नसते, असे म्हणतात. त्याचीच प्रचिती बिहारमधील एका ताज्या घटनने आली आहे. आपल्या हरवलेल्या पोपटाला शोधून देण्यासाठी बिहारच्या एका गृहिणीने चक्क 25 हजार रुपयांची बोली लावली आहे.

बिहारच्या नवादा जिल्ह्यातील बबीता देवी नावाच्या महिलेने पत्रके छापून ती वाटली आहेत. त्यात आपल्या पोपटाला शोधून आणणाऱ्यास 25 हजार रुपयांचे ईनाम दिले जाईल, असे तिने जाहीर केले आहे.

तीन जानेवारी रोजी बबीता देवी यांचा पोपट हरवला. त्या नंतर त्यांनी अनेक दिवस जेवणसुद्धा केले नाही. गेल्या आठ वर्षांपासून हा पोपट त्यांच्या कुटुंबाचा सदस्य बनून राहिला होता. तो सर्व कुटुंबाला भल्या पहाटे उठवायचा. या काळात हा पोपट पिंजऱ्याऐवजी मोकळ्यावर ठेवण्यात आला होता, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

या महिलेच्या तीन मुलांनी आणि नातेवाईकांनी व्हाटसअपच्या माध्यामातून या पोपटाच्या शोधासाठी मोहीम उघडली आहे. मात्र अद्याप त्यांना यश आलेला नाही, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

Leave a Comment