आधार कार्डात वाढ


भारतीय जनता पार्टी संसदेत विरोधी बाकावर बसली असतानाच्या काळात देशात आधार कार्डाची मोहीम सुरू झाली. परंतु भाजपाने या मोहिमेला विरोध केला. पण तरीही आधार कार्डाविषयी बरेच गैरसमजही पसरत गेले. परिणामी आधार कार्ड नोंदीच्या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही आता मात्र भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली आहे आणि तिला आता आधार कार्डाचे महत्त्व कळायला लागले आहे. त्यामुळे सरकारने अनेक योजनातील सबसिडीची रक्कम मध्यस्थाला न देता ग्राहकाच्या खात्यात थेट जमा करायला सुरूवात केली आहे. असे अनुदान जमा करण्याच्या कामात आधार कार्डाचा उपयोग होतो आणि एक व्यक्ती दोन ठिकाणी दोन वेळा अनुदान घेऊ शकत नाही. परिणामी अनुदानाच्या वाटपातील भ्रष्टाचाराला खीळ बसते आणि सरकारचा पैसा वाचतो.

या गोष्टी कळल्यापासून भारतीय जनता पार्टीलाही आधार कार्ड आवश्यक वाटायला लागले. सुरूवातीच्या काळात आधार कार्डावर टीका केलेल्या भाजपाने उलट आधार कार्डाच्या नोंदणीला गती दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसात दररोज नोंदल्या जाणार्‍या आधार कार्डांची संख्या तीन लाखांवरून पाच लाखांवर गेली. अजूनही देशातले ७ ते आठ लाख लोक दररोज आधार कार्ड काढण्यासाठीच्या रांगांमध्ये उभे राहतात. त्यामुळे सध्या देशातल्या १८ वर्षांवरील ९९ टक्के नागरिकांकडे आधार कार्ड उपलब्ध आहेत. सरकारचे व्यवहार ऑनलाईनच होणार आणि त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आधार कार्डाशी जोडलेले बँक खाते आवश्यक आहे. याचा अनुभव लोकांना व्हायला लागला आणि नोटाबंदीपासून आधार कार्डाच्या नोंदणीला विलक्षण गती आली.

केंद्र सरकार देशामध्ये अनुदान वाटपाची एक क्रांतिकारक योजना राबवण्याच्या विचारात आहे. ती जगात आजवर कोठेही राबवली गेलेली नाही. मात्र ती प्रभावीपणे राबवायची असेल तर देशातल्या सर्व नागरिकांची आधार कार्डाची नोंदणीही झाली पाहिजे आणि त्यांची बँक खाती आधार कार्डाला जोडलेली असली पाहिजेत. आधार कार्डाशी निगडित बँक खात्यांमुळे सरकारच्या भ्रष्टाचारातील ३६ हजार कोटी रुपये वाचलेले आहेत. आधार कार्डाची कल्पना मांडणारे नंदन निलेकणी हे कॉंग्रेसचे समर्थक आहेत. ते बंगळुरु लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवारसुध्दा होते. त्यांची आधार योजना भाजपाला आवडली आहे. तेव्हा नंदन निलेकणी आता भाजपात येणार का असा प्रश्‍न आहे. ते भाजपात आल्यास भाजपाचा मोठा फायदा होईल.

Leave a Comment