दुर्दैवी रेल्वे अपघात


छत्तीसगढच्या जगदलपूरपासून ओरिसातील भुवनेश्‍वरपर्यंत जाणार्‍या हिराखंड एक्स्प्रेस या सुपरफास्ट रेल्वेला शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात ३६ प्रवासी प्राणास मुकले तर ५० जण जखमी झाले. आंध्राच्या विजय नगरम् जिल्ह्यातील कुनेरू या रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. त्यात सामान वाहून नेणारा डबा, दोन सामान्य डबे, एक वातानुकूलित डबा आणि दोन स्लीपर कोचेस असे सात डब्बे रूळावरून घसरले. त्यातल्या स्लीपर कोचेसना जास्त नुकसान सहन करावे लागले. हे दोन डबे पूर्ण उद्ध्वस्त झाले. अपघाताचे कारण अद्यापही समजले नाही. परंतु सुरू होण्याच्या ठिकाणापासून ते तिचा प्रवास संपेपर्यंत ती नक्षलग्रस्त भागातून जाते. त्यामुळे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या घातपाती कारवाईमुळेच हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

काही लोकांनी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताचे कारण वेगळे आहे आणि ते रेल्वेच्या कर्मचार्‍यांशी निगडित आहे. कुनेरू या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा नाही. त्यामुळे ती कुनेरूवरून जात असताना अतीशय वेगात जाते. त्या वेगामुळे हा अपघात झाला असावा असा काही लोकांचा अंदाज आहे. कारणे काहीही असली तरी झालेल्या अपघातातील मृतांविषयी हळहळ वाटल्याशिवाय राहत नाही. सध्या आपल्या देशातले नक्षलवादी हताश झाले आहेत. कारण गेल्या दोन वर्षात त्यांच्या विरोधात केंद्र सरकारच्या गृहखात्याने मोठी प्रभावी मोहीम सुरू केलेली आहे. अनेक नक्षलवादी शरण येत आहेत आणि नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसलेला आहे. आता हाती उरलेल्या शक्तीचा वापर करून शक्य तेवढ्या घातपाती कारवाया कराव्यात आणि आपली शक्ती दाखवून द्यावी असा विचार नक्षलवादी करत असतील असा तर्क आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हा अपघात घडवला असावा.

गेल्याच वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये असाच एक मोठा अपघात उत्तर प्रदेशात कानपूरजवळ झाला होता. त्या अपघातामध्ये इंदूर ते पाटणा ही पॅसेंजर रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे १०० जण ठार तर २०० लोक जखमी झाले होते. या गाडीचे चौदा डबे रुळावरून घसरले होते आणि कानपूरच्या पुखरायन या स्थानकाजवळ अपघात झाला होता. दोन्ही अपघातातील एक समान मुद्दा म्हणजे ते दोन्हीही अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाले आहेत. कालचा अपघात साडेअकरा वाजता झाला तर पुखरायन येथील अपघात पहाटे तीन वाजता झाला होता.

Leave a Comment