जमिनीपासून १२५ उंच आकाशात डॉक्टर जोडप्याचा साखरपुडा!


अलाहाबाद : आपले लग्न कायम लोकांच्या स्मरणात राहावे यासाठी काहीजण कोट्यवधी रुपये खर्च करतात, तर काहीजण जरा हटके स्टाईल अवलंबतात. मेडिकलचा अभ्यास करताना एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या एमबीबीएस डॉक्टर्सच्या जोडीनेही आपला साखरपुडा अनोख्या पद्धतीने केला असून या एमबीबीएस डॉक्टर्सच्या जोडप्याने आपला साखरपुडा जमिनीपासून १२५ फूट उंच आकाशात पार पाडला, जो साधरणत: कुणीही विसरु शकणार नाही.

अलाहाबादमध्ये सध्या हा अनोखा साखरपुडा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला असून पुढील महिन्यात विवाहबंधनात अडकणाऱ्या या डॉक्टर जोडीने अलाहाबादमध्ये नदी संगमापासून १२५ फूट उंच आकाशात हॉट एअर बलूनमध्ये स्वार होऊन हवेत तरंगत एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घातली. यावेळी वधू-वराचे काही नातेवाईकही उपस्थित होते.

या डॉक्टर जोडीचे नाव डॉ. धीरज सिंह आणि डॉ. प्रीती सिंह असे असून डॉ. धीरज हे मूळचे उत्तरखंडमधील हल्दवानी शहरातले असून, डॉ. प्रीती सिंह या उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवाशी आहेत. कानपूर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना धीरज आणि प्रीती यांची मुलाखत झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. डॉ. धीरज यांनी सर्जरीत पीजी, तर डॉ. प्रीती यांनी पॅथोलॉजीमध्ये पीजीचे शिक्षण घेतले आहे.

अॅडव्हेंचर गोष्टींमध्ये डॉ. धीरज यांना रस असल्याने नेहमीच वेगळे काहीतरी करत असतात. त्यांना गेल्या आठवड्यात कळळे की, अलाहाबादमध्ये संगमावर माघ यात्रेतील हॉट एअर बलूनवर अनेकजण स्वार होत आहेत. याचवेळी नेमके त्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरु होते. मग डॉ. धीरज यांना हॉट एअर बलूनमध्ये स्वार होऊन आकाशात साखरपुडा पार पाडण्याची कल्पना सूचली. डॉ. धीरज आणि डॉ. प्रीती व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर विवाहबंधनात अडकणार आहेत. विवाहसोहळाही सगळ्यांच्या आठवणीत राहील असे काहीतरी करण्याची योजना दोघांनी आखली आहे. मात्र, लग्नासाठी काय अनोखी योजना आखली आहे, याबाबतचा खुलासा अद्याप केलेला नाही.

Leave a Comment