किती हा अविचार ?


माणसाला आपला अपमान सहन करता येत नाही. त्यामुळे अनेक लोक आपल्या मानासाठी वाटेल ते करायला तयार होत असतात. काल पुण्यात दहा रुपयांवरून झालेल्या भांडणात एका महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आता दोघांना अटक करण्यात आली असून दोन लहान मुलींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकरण अगदी साधे होते. एक लहान मुलगा आपल्या आईने दिलेले दहा रुपये घेऊन दुकानात चालला असताना त्याच्यापेक्षा वयाने किंचित मोठ्या असलेल्या एका मुलीने त्याच्या हातातले दहा रुपये हिसकावून घेतले. त्यावर त्या मुलाची आई मुलीच्या आईला भांडायला गेली पण मुलीच्या आईनेच मुलाच्या आईला मारहाण केली. या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने त्या निष्पाप बाईने जाळून घेऊन आत्महत्या केली.

आपण केवळ दहा रुपयावरून झालेल्या भांडणात आपला जीव गमावत आहोत याचे तिला भान राहिले नाही. आपण अनेक आततायी लोक पहात असतो. ते लहान सहान गोष्टीवरून सतत कोणाशी ना कोणाशी तरी तंडत असतात किंवा घरात वयाने मोठे असतील तर सर्वांवर डाफरत असतात. अशा लोकांना आपल्या मनातला राग आवरता येत नाही. ते स्वत: तर सतत रागावून आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवून घेत असतात. ते स्वत:ही सुखाने जगत नाहीत आणि लोकांनाही जगू देत नाहीत. त्यांना आपण कशासाठी एवढा सारा राग राग करीत आहोत याचेच भान नसते. ते अगदी किरकोळ कारणावरून घर डोक्यावर घ्यायला मागेपुढे पहात नाहीत. कारण किती लहान आहे आणि आपण किती रागावत आहोत हे त्यांना कळत नाही.

आता या महिलेलाही आपला अपमान एवढा झोंबला की आपण त्यावरून जीव दिला तर आपल्या लहान मुलाचे आणि कुटुंबाचे काय होईल याची काही फिकीर लागली नाही. मागे १९५० च्या दशकात सर्वोच्च न्यायालयात खुनाबद्दल फाशीची शिक्षा झालेले एक प्रकरण आले होते. त्या खुनामागचे कारण समजले तेव्हा न्यायमूर्तींनी कपाळावर हात मारून घेतला. त्या काळात रुपयांचे १०० पैसे असले तरी आणे मात्र १६ असायचे. मग चार आणे म्हणजे २४ पैसे की २५ पैसे यावरून वाद होत असत. दिल्लीतल्या एका दुकानात असाच एका पैशावरून वाद झाला आणि तो एवढा वाढला की, त्यातून त्या ग्राहकाने दुकानदाराचा खून केला. अविचारालाही काही मर्यादा असाव्यात.

Leave a Comment