लक्षाधीश आणि भिक्षाधीश


एक काळ असा होता की, श्रीमंत लोकांचे वर्णन लक्षाधीश असा केला जात असे. कारण त्याच्याकडे लाखांनी पैसा असेल असा लोकांचा समज झालेला असे. तेव्हा लक्षाधीश म्हणजे समाजातला सर्वात श्रीमंंत वर्ग. आपली अर्थव्यवस्था बळकट होत चालली तशी लाखांत पैसा कमावणारांची आणि बाळगणारांची संख्या वाढली. कोणी लक्षाधीश झाला असेल तर त्याचे कोणाला कौतुक वाटेनासे झाले. पुढे कोट्यधीश असणारांचे कौतुक व्हायला लागले आणि करोडपती हे समाजातले मोठे श्रीमंंत समजले जायला लागले. आता आता तर अर्थव्यवस्था मोकळी झाली आहे आणि कोणी वाटेल तेवढा पैसा कमवावा अशी मोकळीक मिळाली त्यामुळे कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारांची संख्याही वाढली. समाजात आता अब्जात रुपये कमावणारे आणि बाळगणारे हे सर्वात श्रीमंत होऊन बसले.

अब्ज म्हणजे शंभर कोटी. तेव्हा भारतात त्यांचीही संख्या वाढली असून भारतात असे ८४ लोक आहेत की ज्यांना अब्जाधीश म्हणता येेते. खरे तर आपण आधी लक्षाधीश आणि कोट्यधीश म्हणून ज्यांचा उल्लेख करीत होतो ते लोक कोटीत आणि लाखात मोजत होते ते रुपये होते. आता भारतात ८४ लोक अब्जाधीश आहेत ते अब्जाच्या मापाने कमावत आहेत ते रुपये नसून डॉलर्स आहेत. या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की भारतात ८४ अब्जाधीश आहेत आणि त्यांच्याकडे अब्जात जमा आहे ती रक्कम आणि मालमत्ता डॉलर्समध्ये आहे. एक डॉलर म्हणजे ६६ रुपये. आता अंदाज करा की हे अब्जाधीश किती कोटी रुपये बाळगून आहेत. गेल्या काही दशकांत समाजवादी अर्थव्यवस्था कोसळली असून सारे जगच आता भांडवलशाहीचे उपासक झाले आहे. या काळात केवळ भारतातलेच नाही तर सार्‍या जगातलेच कोट्यधीश हे अब्जाधीश झाले असून त्यांच्याकडील मालमत्ता सतत वाढत आहे. त्याचेही आकडे डोळे फिरवणारे आहेत.

भारतात सर्वात श्रीमंत कोण असा प्रश्‍न आपल्याला पडला असेलच. मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत असून त्याच्याकडे १९.३ अब्ज डॉलर्स एवढी मालमत्ता आहे. त्यानंतर क्रमांक लागतो दिलीप शांगवी यांचा (१६.७ अब्ज डॉलर्स) तर तिसरा क्रमांक आहे अझीम प्रेमजी यांचा. ज्यांच्याकडे १५ अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. सार्‍या भारतात एकूण तीन हजार अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती असून त्यातली ५८ टक्के संपत्ती केवळ एक टक्का श्रीमंतांकडे आहे तर उर्वरित केवळ ४३ टक्के संपत्ती ९९ टक्के भारतीयांकडे आहे.

Leave a Comment