
नवी दिल्ली: मारूती सुझुकी या लोकप्रिय कंपनीने ‘इग्निस’ ही आपली नवी कार लॉन्च केली आहे. कंपनीला या कारकडून मोठ्या अपेक्षा असून कॉम्पॅक्ट क्रॉसओवर मारूती सुझुकी लाईनअपमधील ही तिसरी कार असून मारूती सुझुकी ‘इग्निस’ कार तरूणांना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. या कारचे वेगवेगळे व्हेरिएंट असून ४ लाख ५९ हजारांपासून या कारची किंमत सुरू होते.
बाजारात आली मारूती सुझुकीची ‘इग्निस’
या कारमध्ये अनेक नवे आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत. जसे की आधी सांगितले ही कार तरूणांना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आल्याने या कारमध्ये टचस्क्रीन असलेले इन्फोटेन्मेंट सेटअप आणि इनबिल्ट नॅव्हिगेशन स्क्रीन देण्यात आली आहे. यासोबतच या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहेत. कारचे पेट्रोल मॉडेल २०.८९किमी प्रतिलिटर मायलेज तर डिझल इंजिन २६.८०किमी प्रतिलिटरचा मायलेज देणारे आहे.
इग्निस ही कार रिटझला रिप्लेस करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे . इग्निस ही कार महिंद्रा केयुव्ही १०० या कारला टक्कर देण्याची शक्यता आहे. या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स आणि एबीएससारखे सेफ्टी फिचर्स आहेत. तसेच कारमध्ये ड्युअल टोन रूफ देण्यात आले आहे. यासोबतच इग्निस ही कार निळ्या, पांढ-या आणि काळ्या रंगात उपलब्ध होणार आहे. तेच लाल रंगासोबत ब्लॅक रूफ मिळणार आहे. इग्निसमध्ये युएसबी, ब्ल्यूटूथ यांसारखे अनेक फिचर्सही देण्यात आले आहेत.
