सात प्रक्षेपणे आणि ३४ उपग्रह


भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) २०१६ साली केलेल्या कामांचा आढावा सादर केला असून तो पाहिला म्हणजे येत्या तीन ते चार वर्षात भारताने अमेरिकेच्या नासा या संस्थेला मागे टाकलेले असेल या म्हणण्यावर विश्‍वास बसतो. २०१६ या वर्षात इस्रोने सात प्रक्षेपणे केली आणि त्यातून ३४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. इस्रोचे हे काम केवळ संख्यात्मक दृष्ट्याच उत्तम आहे असे नाही तर ते दर्जाच्या संबंधातही चांगले आणि अनेक नवे विक्रम प्रस्थापित करणारे ठरले आहे. या वर्षात भारताने मंगळाच्या कक्षेत सोडलेल्या मार्स या उपग्रहाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हा उपग्रह दोन वर्षांपासून मंगळाला प्रदक्षिणा घालत असून त्याच्यावर सोपवलेली निरीक्षणे करण्याची कामे व्यवस्थित करीत आहे. हा एक विक्रम आहे या बाबत जगात भारताची बरोबरी करू शकणारी केवळ तीनच राष्ट्रे आहेत. भारत या बाबत पहिल्या पाच देशात आहे.

इस्रोने २०१६ या वर्षात अवकाशात सोडलेल्या उपग्रहात आठ स्वत:चे उपगह होते तर चार उपग्रह भारतातल्या निरनिराळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या मुलांनी तयार केलेली आहेत. बाकीचे २२ उपग्रह परदेशातले आहेत. भारताने या वर्षात अवकाशतल्या मोहिमेतले इंधन पुनर्वापर करता येईल याविषयीचे तंत्रज्ञान विकसित केले आणि त्याच्या आधारे सोडण्यात आलेले उपग्रह चांगले काम करीत आहेत. स्क्रमजेट नावाचेही तंत्रज्ञान भारताने तयार केले आहे आणि ते यशस्वीपणे वापरून दाखवले आहे. याच वर्षात भारताच्या ऍस्ट्रोसॅट या अंतराळ प्रयोगशाळेलाही एक वर्ष पूर्ण झाले आहे. ही प्रयोगशाळा ठरवून दिल्याप्रमाणे अंतराळात चकरा मारत आहे.

२०१६ या वर्षाची सुरूवात नेव्हीगेशन सॅटेलाईट या प्रकाराचा उपग्रह अंतराळात सोडण्याने झाली. त्याला पीएसएलव्ही सी ३१ या प्रक्षेपकाने अवकाशात सोडले. नंतर क्रमाने याच मालिकेतले चार उपग्रह सोडण्यात आले. त्यासाठी कोणाचीही मदत घेतली नाही. या उपग्रहातून इस्रोने अनेक नव्या तंत्रज्ञानांचा वापर केला आहेच पण ही तंत्रज्ञाने पहिल्याच चाचणीत यशस्वी झाली आहेत. असाच अनेक तंत्रज्ञानांचा वापर असलेले आरएलव्ही टीडी हे अंतराळ यान ेंअंतराळात सोडण्यात आले. जून मध्ये झालेल्या प्रक्षेपणात इस्रोेने एकाच वेळी २० उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचा विक्रम केला. त्याने प्रथमच विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह अवकाशात नेऊन सोडून दिले. ते चारही उपग्रह छान काम करीत आहेत.

Leave a Comment