खांदेरी किल्ला अजरामर


भारतात इंग्रज येत होते आणि ते काही वेगळे लोक आहेत हेही दिसत होते पण भारतात त्या काळात राजकारण करणार्‍या अकबर, औरंगजेब इत्यादी राजांना हे लोक तंत्रज्ञान आणि नौदलाच्या बाबतीत आपल्यापेक्षा आघाडीवर असल्याने कधी ना कधी आपल्यावर मात करतील याचा अंदाज आला नाही. त्या काळात या ब्रिटीशांचा खरा धोका ओळखणारे शिवाजी महाराज हे एकमेव राजे होेते. म्हणूनच त्यांनी आरमाराची उभारणी केली आणि सागरी किल्ले उभारले. त्यांचा खांदेरी हा किल्ला त्या काळात अजय समजला जात होता. भारतीय नौदलाने आता पूर्णपणे देेशी बनावटीची पाणबुडी तयार केली असून तिला खांदेरी असे नाव दिले आहे. हे नाव अन्वर्थक आहे. तिचे काल माझगाव डॉक्समध्ये जलावरण करण्यात आले.

गेल्याच महिन्यात आठ तारखेला भारताच्या नौदलाचा पाणबुडी दिन साजरा करण्यात आला. कारण या तारखेला भारताची कलवरी ही पाणबुडी नौदलात सामील झाली होती. त्या घटनेला त्या दिवशी पन्नास वर्षे झाली. भारतीय नौदलाची पाणबुडी सामील करण्याची सुरूवात १९६७ साली झाली. त्या काळात आपण परदेशात तयार झालेल्या पाणबुड्या वापरत होतो. नंतर आपण स्वत:च त्या तयार करायला लागलो. १९९२ साली भारत हा जगातला फार कमी देशातला असा देश ठरला ज्याने स्वत: पाणबुडी तयार केली आहे. अर्थात भारताने त्यासाठी परदेशी तंत्रज्ञान आणि सहकार्य घेेतले होते. त्यावेळी जलावतरण झालेली पाणबुडी होती शाल्की. त्यानंतर शंकुल ही पाणबुडी आपण पाण्यात सोडली. या दोन्ही पाणबुड्या अजूनही सेवेत आहेत.

आता आपण पूर्णपणे देशी बनावटीची खांदेरी ही पाणबुडी तयार केली आहे. तिच्या अनेक चाचण्या घेतल्यानंतर ती येत्या डिसेंबरमध्ये नौदलात सामील होईल. तिची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ती पाण्यात असो की पाण्याखाली असो ती शत्रूच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांना लक्ष्य करू शकते. ती असा हल्ला करताना पाण्याखालीच असली पाहिजे असे काही नाही. ती पाण्यावर असतानाही हल्ला करून अशी क्षेपणास्त्रे नष्ट करू शकते. ती हेरगिरीही करू शकते आणि शत्रूंच्या पाणबुडीच्या मार्गात पाणसुरूंगही पेरू शकते. अशा प्रकारची पाणबुडी तयार करणे हे मोठे कठिण काम होते पण भारतीय तंत्रज्ञांनी ते काम छान केले आहे. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या सागरी हालचालींचा विचार करता अशी पाणबुडी आपल्या नौदलाच्या पाणबुड्यांच्या ताफ्यात हवीच होती.

Leave a Comment