आणखी एका जवानाची खंत


सीमा सुरक्षा दलातल्या तेजबहादूर यादव या जवानाने आपल्या युनिटमधील अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. तिच्या पाठोपाठ आता आणखी एका जवानाने आपले मनोगत व्यक्त करून कैफियत मांडली आहे. जीतसिंग असे या जवानाचे नाव असून तो निमलष्करी दलाच्या केन्द्रीय राखीव पोलीस दलात शिपाई आहे. तो सध्या मथुरा येथे पोस्टिंगला आहे. त्याने आपली कैफियत थेट पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याकडे केली असून आपल्या दलाच्या जवानांच्या जीवनात काहीतरी बदल व्हावा यासाठी त्यांनीच आता लक्ष घालून काहीतरी करावे अशी विनंती केली आहे. एका मागे एक निमलष्करी दलातले जवान आपली व्यथा व्यक्त करीत आहेत हे खरे पण जीतसिंग याची पोस्ट ही तेजबहादूर यादवच्या पोस्टसारखी स्फोटक नाही.

ही एक साधी मागणी आहे. ती करताना आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना काही गोवलेले नाही. किंबहुना कोणाचाही भ्रष्टाचार बाहेर काढलेला नाही. पण केन्द्रीय राखीव पोलीस दलासारख्या दलाकडे असलेल्या सरकारच्या दुर्लक्षाला वाचा मात्र नक्कीच फोडलेली आहे. ही केवळ त्याचीच कैफियत आहे असे नाही तर देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करण्यास तयार असणार्‍या निमलष्करी दलातल्या सर्वांचीच ती कैफियत आहे. भारतीय लष्करातून निवृत्त होणार्‍या जवानांना अनेक सवलती मिळतात. त्यांंना निवृत्तीनंतर विविध नोकर्‍यांत राखील कोटा असतो. तसा राखीव पोलिसांना नसतो. तो मिळावा. लष्कराप्रमाणे कँटिनच्या सवलती मिळाव्यात असे या जवानाने आपल्या पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

या पत्रात कोणा एकाच्या विरोधात तक्रार नाही पण एकंदरितच निमलष्करी दलातल्या जवानांचे दु:ख बोलके झाले आहे. केन्द्र सरकारला या बाबत कधी ना कधी विचार करावा लागणार आहे. सरकारने सहावा वेतन आयोग नेमला तेव्हा लष्करातल्या काही अधिकार्‍यांनी आपल्या आणि नागरी सेवेतल्या अधिकार्‍यांच्या वेतनात किती फरक आहे हे दाखवून दिले होते. समान पात्रतेच्या मुलकी आणि लष्करी अधिकार्‍यांंच्या वेतनात आणि बढतीच्या मिळणार्‍या संधीमध्ये किती फरक आहे हे अनेकदा सांगितले गेले होते. त्याचा काही ना काही परिणाम झाला आणि लष्करातल्या अधिकार्‍यांच्या वेतनमानात बराच फरक पडला. आता सरकारने निमलष्करी दलाच्या जवानांच्या वेतनातले दोष काढायला काही हरकत नाही.

Leave a Comment