फायनल टॅली आणि परिणाम


विदर्भातील ११ नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली. आता महाराष्ट्राचे नगरपालिकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरपालिका आणि नगरपंचायती असलेल्या गावामध्ये महाराष्ट्रातला निमशहरी आणि वेगळ्या शब्दात सांगायचे तर थोडा ग्रामीण आणि थोडा शहरी असा मतदार वर्ग रहात असल्यामुळे या निवडणुकांनी महाराष्ट्रातल्या विविध राजकीय पक्षांच्या निमशहरी भागातल्या प्रभावावर प्रकाश पडला आहे. तसे पाहता गेल्या काही दिवसांपासून नगरपालिका निवडणुकांच्या संबंधातील निरनिराळ्या प्रकारची आकडेवारी लोकांसमोर येत गेलेली आहे. परंतु ही आकडेवारी नेहमीच काही उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून दिलेली असल्यामुळे या निवडणुकीत नेमका कोणाचा विजय झाला आणि नेमका कोणाचा पराभव झाला याचे स्पष्ट चित्र कधीच उमटत नाही. त्यामुळे आता व्यवस्थित आणि तुलनात्मक आकडे समोर ठेवून निवडणुकीचे विश्‍लेषण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

आता उपलब्ध असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात १९९ नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. या संस्थांमध्ये नगरसेवकांच्या एकूण जागा ४ हजार ७०० एवढ्या आहेत. त्यातील २ हजार ९० नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. कॉंग्रेसच्या वाट्याला ९५२ जागा आल्या असून राष्ट्रवादीने ८१२ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेच्या वाट्याला ६१२ जागा आल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या जागांची टक्केवारी ४४ टक्के एवढी येते. कॉंग्रेसने जिंकलेल्या जागांची संख्या ९५२ असून ती काही एकदम नगण्य नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या जागा एकत्र केल्या तर तो आकडा भारतीय जनता पार्टीच्या जवळपास नक्कीच जातो. तेव्हा या दोन पक्षांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न केला तर तर ते दोघे मिळून भारतीय जनता पार्टीचा विजयरथ नक्कीच रोखू शकतील. आता महाराष्ट्रामध्ये शक्तीपरीक्षणाच्या दोन फेर्‍या होणार आहेत. पहिली फेरी महानगरपालिकांच्या निवडणुकांची असेल. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती करण्याचा गंभीरपणे प्रयत्न चाललेला आहे. कारण काही ठिकाणी भाजपाला शिवसेनेची युती फायद्यात पडणारी आहे. त्यामुळे भाजपाचे नेते युतीबाबत सहर्षपणे हात पुढे करायला तयार आहेत.

नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेचा क्रमांक चौथा आलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते अजून जमिनीवर उतरलेत की नाही माहीत नाही. उतरले तर त्यांना व्यवहार कळणार आहे आणि तो कळला तर दोघांची युती होईल. अशा परिस्थितीत महानगरपालिकांत या युतीची कामगिरी एवढी प्रभावी होईल की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे वेगवेगळे लढले तर त्यांची वाताहत होईल. तेव्हा महानगरपालिकांतसुध्दा कॉंग्र्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एक आले पाहिजेत तरच भाजपाच्या प्रभावाला ते शह देऊ शकतील. नगरपालिकांची आकडेवारी पाहिली असता एक लक्षात येते की भारतीय जनता पार्टीने आपल्या नगरसेवकांची संख्या ३९० वरून २ हजार वर नेलेली आहे. म्हणजे भाजपाची ही कामगिरी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांना बरेच काही शिकवून जाणारी आहे. एवढेच नव्हे तर या पक्षांमधील कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास कमी करणारीसुध्दा आहेत. म्हणूनच या दोन पक्षातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. आजपर्यंत ज्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आपले पक्ष निश्‍चित केले नव्हते त्यांचा ओढा भाजपाकडे आहे. ही गोष्ट कॉंग्रेसला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला हितावह नाही.

असे असले तरी भाजपाचा प्रभाव कमी करून आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढवण्याची एक संधी या दोन पक्षांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत केवळ शहरी पक्ष म्हटले जात होते पण आता भाजपाचा ग्रामीण भागातील प्रभाव वाढत आहे. मात्र तो अजून शहरातल्या प्रभावासारखा निर्विवाद नाही आणि दोन कॉंग्रेससाठी ही छान संधी आहे. तिचा या दोन पक्षांनी नीट वापर केला आणि चाणाक्षपणे युती करून निवडणूक लढवली तर भाजपापेक्षा अधिक जागा ते मिळवू शकतात. तेव्हा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत या दोन कॉंग्रेसने युती करावी अन्यथा त्यांना पराभवाला तर तोंड द्यावेच लागेल परंतु कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वासही कमी होईल. भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत गुजरात, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये एकदा पाय रोवल्यानंतर ते इतक्या भक्कमपणे रोवले आहेत की त्यांच्या विरोधकांना पाय ठेवायला जागासुध्दा ठेवलेली नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. गुजरातेत गेल्या २५ वर्षांपासून कॉंग्रेसला एकदाही सत्ता मिळालेली नाही. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेमध्ये महाराष्ट्राला बालेकिल्ला मानले जात नाही. परंतु भाजपाने जिल्हा परिषदांत पाय रोवले तर तो भाजपाचा बालेकिल्ला होऊ शकतो. त्यापासून त्याला रोखण्याची ताकद आज तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युतीमध्येच आहे.

Leave a Comment