तांदूळ भाव कोसळले, शेतकरी अडचणीत


यंदा उत्तम बरसलेला मान्सून, त्यामुळे तांदळाचे भरघोस आलेले पीक व त्यात नोटबंदीचा बसलेला फटका यामुळे तांदळाचे बाजारातील भाव कोसळू लागले असून तांदूळ निर्यातही रोडावली आहे. परिणामी तांदूळ उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. भारत हा जगातला सर्वात मोठा तांदूळ निर्यातक देश असला तरी यंदा निर्यातीलाही फटका बसला असल्याचे समजते.

भारतातून बास्मती बरोबरच उकडा तांदूळ मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. नोव्हेंबरमध्ये नोटबंदी जाहीर झाल्यामुळे निर्यातीत ५ टकके घट झाली आहे तर यंदा तांदळाचे पीक उत्तम आल्याने बाजारातही तांदूळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. याचा परिणाम भाव कोसळण्यात झाला आहे. तांदळाबरोबरच कापूस व सोयाबीनलाही कमी दराचा फटका बसला आहे. शेतीकामात मजुर रोख पैसा घेऊन काम करतात. नोटबंदीमुळे मजुरांना रोख मजुरी देणे शक्य झाले नव्हते. जून २०१७ पर्यंत देशात ९ कोटी ४० लाख टन अन्नधान्य उत्पादन अपेक्षित आहे. आंध्रातील तांदूळ उत्पादक शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार बाजारात मुबलक तांदूळ येतो आहे. निर्यातीची मागणी असली तरी ती मर्यादित आहे. भारतातून बास्मतीची निर्यात पश्चिम आशियाई देशात प्रामुख्याने होते तर बाकी जातीचा तांदूळ आफ्रिकी देशात निर्यात होतो.

Leave a Comment