नवे समीकरण


बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांनी परस्परांची प्रशंसा केली. आता नितीशकुमार यांनी बिहारात दारूबंदी जाहीर केली आहे आणि तिची अंमलबजावणी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता त्यांनी ज्यांच्या हातात हात घालून तिथे सत्ता मिळवली आहे त्या लालूप्रसादांनी तिथे असे काही जंगलराज निर्माण करून ठेवले आहे की, तिथे दारुबंदीची अंमलबजावणी हे स्वप्नच वाटावे. म्हणूनच त्यांना आता गुजरातेतली दारुबंदी आठवली. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना म्हणजे १२ वर्षे तिथे दारुबंदीची अंमलबजावणी केली याची नितीशकुमार यांनी स्तुती केली. मग मोदींनीही नितीशकुमार यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केेला असेल तर नवल वाटायला नको. या स्तुतीसुमनांत काही तथ्य नाही कारण त्यामागचा हेतू वेगळाच आहे. एकेकाळी बिहारात नितीशकुमार हे भाजपाचे मित्र होते. भाजपाशी युती करून त्यांनी १२ वर्षे मुख्यमंत्रीपद मिळवले होते. अशी भाजपाशी युती असतानाही नितीशकुमार यांच्या मनात मोदी यांच्याविषयी मोठे किल्मीष होते. आता युती मोडली आहे पण आता त्यांच्या मनात मोदी यांच्या विषयीचे प्रेम उतू जायला लागले आहे.

मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली तेव्हा सर्वांनी मोदी यांचे अभिनंदन केले पण नंतर त्या सर्वांनी त्यांना टीकेचे लक्ष्य बनवले. शेवटी ते सारे विरोधकच तेव्हा त्यांनी आपले शब्द फिरवून नंतर मोेदींच्या विरोधात राळ उडवली. शिवसेने सारखा मित्रपक्षही नोटाबंदीवर तुटून पडायला लागला. अशा वातावरणातही नितीशकुमार हे नोटाबंदीच्या बाजूने उभे राहिले ते शेवलटपर्यंत. नितीशकुमार यांच्या मनातले हे प्रेम नोटांच्या संबंधात तर होतेच पण ते प्रामुख्याने मोदी यांच्याविषयीचे वैयक्तिक होते. कारण आता नितीशकुमार यांना मोदींची दोस्ती हवीशी वाटायला लागली आहे. बिहारात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सार्‍या मोदी विरोधकांना एकत्र करून भाजपाचा पराभव केलाच पण सत्ताही हस्तगत केली. त्यांच्या या मोदी विरोधी राजकारणाचा त्यांना स्वत:ला फायदा झालाच पण नको त्यांची किंमत वाढून बसली. लालूप्रसाद यादव हे राजकारणात अगदीच निष्प्रभ होण्याच्या बेतात होते. पण त्यांची नाव या मोदीविरोधी महागठबंधनामुळे तरली. कॉंग्रेसला जिथे दहापेक्षा अधिक जागा मिळण्याची अपेक्षा नव्हती तिथे त्यांना बरीच मजल मारता आली. आपल्या पुण्याईवर कॉंग्रेस आणि लालूप्रसाद यांनी नाव तरली याची जाणीव नितीशकुमार यांना आहे.

असे असले तरीही नितीशकुमार यांच्या पक्षाच्या जागा लालूंच्या पक्षापेक्षा कमी असतानाही नितीशकुमार यांनाचा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. त्यामुळे लालूही नाराज आहेत. बिहारच्या जनतेने महागठबंधनाला कौल दिला असला तरी तो खर्‍या अर्थाने आपल्यालाच मिळालेला कौल आहे असे लालूजींना वाटते. त्यामुळे त्यांनी आपल्या दोघा मुलांना मंत्रिमंडळात घ्यायला लावले. लालू आणि नितीश यांच्यात सारे काही ठीक चाललेले नाही. नितीशकुमार यांना कधीतरी भाजपाशी केलेली युती आणि भाजपा बरोबरचा १२ वर्षांचा सहवास आठवतो. आपण मोदी यांच्याशी उगाच पंगा घेतला असे त्यांना वाटते. भाजपात खरे तर नितीशकुमार यांना अडवाणी यांच्यासारखे काही नेते अनुकूल होते आणि त्यांच्याच बहकाव्याने नितीशकुमार मोदींना व्यक्तिश: विरोध करीत होते. ते अडवाणी आता भाजपातच विजनवासात गेले आहेत. भाजपात आता मोदी युग सुरू झाले आहे. तेव्हा आता मोदी यांचा उगाच द्वेष करण्यात काही अर्थ नाही याची जाणीव नितीशकुमार यांना व्हायला लागली आहे. याचा अर्थ ते आता लालूंशी असलेेली युती मोडून भाजपाच्या गळ्यात गळा घालणार आहेत असा होत नाही. पण मोदींशी उगाच वैर करण्यात काही मतलब नाही हे त्यांना जाणवत आहे हे नाकारता येत नाही.

याच भावनेने नितीशकुमार आणि मोदी एकमेकांच्या जवळ येत आहेत. अर्थात त्याला एक राष्ट्रीय संदर्भही आहे. या दोघांचे जवळ येणे जारी राहिले तर राष्ट्रीय राजकारणात जनता दल (यू) हा पक्ष भाजपाच्या जवळ येण्याची शक्यता आहे. खरे तर नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली युती मोडण्याच्या आधी त्यांचा जनता दल (यू) हा पक्ष भाजपा प्रणित रालो आघाडीचा मुख्य घटक होता. भाजपाने जेव्हा पासून ही आघाडी संघटित केली आहे तेव्हा पासून या आघाडीचे निमंत्रकपद जनता दल (यू) याच पक्षाकडे राहिलेले आहे. पूर्वी जॉर्ज फर्नांडिस आणि अलीकडेपर्यंत शरद यादव हेच आघाडीचे निमंत्रक होते. ही मैत्री कायम राहिली असती तर आघाडीला आणि भाजपाला लोकसभेत यापेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या. पण नितीशकुमार यांची मती फिरली. आता त्यांना पश्‍चात्ताप होत असावा असे वाटते. कारण पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना त्यांचे विरोधक आणि शिवसेेनेसारखे मित्रपक्ष कॉर्नर करण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरीही मोदींची लोकप्रियता काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. उलट ती वाढत आहे. त्यामुळे आपण उगाच मोदी विरोधाचा फुटका स्वर लावला अशी भावना नितीशकुमार यांच्या मनात जागी झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिच्यातूनच या दोन नेत्यांचे संबंध सुधारत आहेत.

Leave a Comment