भूमाता ब्रिगेड आता केरळात


भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी आता केरळातल्या साबरीमल मंदिराकडे मोर्चा वळवण्याचे ठरविले आहे. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी महाराष्ट्रातल्या विविध मंंदिरात जाऊन लढा दिला आहे. त्यांनी आधी नगर जिल्ह्यातल्या शनि शिंगणापूरच्या मंदिरात महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवायला मंदिराच्या ट्रस्टींना भाग पाडले. त्या पाठोपाठ त्यांनी मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांचा हक्क शाबित केला. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन लढा दिला. न्यायालय त्यांच्या बाजूने उभे राहिलेच पण मुस्लिम समाजातल्या महिलांच्या संघटनांनीही त्यांना पाठींबा दिला. तृप्ती देसाई यांनी नंतर त्र्यंबकेश्‍वराच्या मंदिरातलीही महिलांच्या प्रवेशावरची बंदी उठवायला ट्रस्टींना भाग पाडले. आता त्यांनी केरळाच्या पट्टणमथिट्टा जिल्ह्यातल्या साबरीमल मंदिराचे प्रकरण हाती घेतले आहे.

या मंदिरातला अय्यप्पा हा देव ब्रह्मचारी आहे. त्यामुळे तिथे वय वर्षे १० ते ५० या गटातल्या महिलांना प्रवेश दिला जात नाही. महिलांना प्रवेश दिला तर मासिक पाळी सुरू असलेल्या महिलाही आत शिरतील आणि मंदिर अपवित्र होईल असे या प्रथेच्या समर्थकांचे म्हणणे आहे. आता तृप्ती देेसाईच्या भूमाता ब्रिगेडने १४ जानेवारीच्या सुमारात या मंदिरात प्रवेश करून प्रवेश बंदीच्या प्रथेच्या विरोधात बंड करण्याचा निर्धार केला आहे. त्यांचा हा प्रवेश नेमका कसा असेल याची काही कल्पना आलेली नाही पण मंदिराचे ट्रस्टी सावध झाले असून त्यांनी भूमाता ब्रिगेडच्या बंडाला मोडता घालण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या केरळात डाव्या चळवळीत काम केलेल्या कार्यकर्त्यांचे सरकार आहे आणि त्यांनी आपल्या चळवळीशी इमान राखत तृप्ती देसाई यांना पाठींब जाहीर केला आहे.

एका बाजूला अशी आंदोेलनाची चर्चा सुरू असतानाच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे आणि तिथे या प्रकरणाची सुनावणी येत्या २० फेब्रूवारीला होणार आहे. साबरीमल मंदिरातील प्रवेशबंदीची ही प्रथा हजार वर्षांपेक्षाही जुनी आहे. तिच्यावर कधी चर्चा झाली नाही पण गेल्या दोन तीन वर्षांपासून अशी चर्चा होत आली आहे आणि आताच हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. तृप्ती देसाई यांच्या भूमाता ब्रिगेडप्रमाणेच केरळात काम करणार्‍या काही महिला संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालय महिलांच्या बाजूने निकाल देईल अशा आशा आहे. तसे झाल्यास तो भूमाता ब्रिगेडचा अप्रत्यक्ष का होईना पण विजय असेल.

Leave a Comment