इस्रोची मोहीम किती स्वस्त ?


भारताच्या अंतराळ संशोधनात प्रचंड झेप घेतलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) हिने जगात या क्षेत्रात तिसरा क्रमांक पटकावला असून जगातल्या पहिल्या पाच राष्ट्रांनाच ज्या गोष्टी शक्य झाल्या आहेत त्या शक्य केल्या आहेत. मंगळावर पाठवली जाणारी सर्वात कमी किंमतीतली मोहीम भारताने पाठवलेली आहे. आजवर आंध्र प्रदेेशाच्या श्रीहरिकोटा या अंतराळ केन्द्रावरून १२० उपग्रह अवकाशात सोडले असून त्यांत अमेरिका, जर्मनी अशा प्रगत देशांचेही उपग्रह समाविष्ट आहेत. उपग्रहांचे प्रक्षेपण करून देण्याचा उद्योगच चांगला करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. कारण जगात आता या उद्योगात ५४ अब्ज डॉलर्सची उलाढाल अपेक्षित आहे. त्यातला मोठा हिस्सा भारताला मिळावा अशी भारतीय शास्त्रज्ञांची धडपड आहे.

या धंद्यात भारताची स्पर्धा जपान आणि यूरोपीय स्पेस एजन्सी बरोबर आहे. या देशाच्या प्रक्षेपण करणार्‍या कंपन्या सरकारी आहेत पण अमेरिकेत हे काम करणार्‍या काही खाजगीही कंपन्या आहेत. त्यांच्याशीही भारताच्या इस्रोला स्पर्धा करावी लागत आहे. कारण या कंपन्याही स्वस्तात प्रक्षेपण करण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताने मंगळावर आपले स्वत:चे यान पाठवले. हे यान मंगळाच्या कक्षेत गेले. तिथे मिथेन वायू आहे का याचा तपास करणे हा या मोहिमेचा हेतू होता. तसा तोे सापडला असता तर मंगळावर कधी काळी जीवसृष्टी होती याचा अंदाज येणार आहे. भारताची ही मोहीम फार स्वस्तात झाली. या मोहिमेवर सात कोटी ४० लाख डॉलर्स खर्च झाला.

अमेरिकेच्या अशाच मोहिमेवर झालेल्या खर्चाच्या केवळ ११ टक्के एवढा हा खर्च आहे. अमेरिकेच्या नासा या यंत्रणेकडून अमेरिकेचे उपग्रह अवकाशात पाठवले जातात ते बहुतेक करून पीएसएलव्ही या रॉकेटांच्या साह्याने पाठवले जातात आणि एका छोट्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी तिथे ३ कोटी डॉलर्स खर्च येत असतो. मंगळावर यान पाठवण्याचा अमेरिकेेचा खर्च तर काही विचारायलाच नको इतका प्रचंड असतो. भारतातून असे उपग्रह पाठवण्याचा खर्च त्या मानाने किती तरी कमी असतो. १९६० सालच्या दशकात भारताचा या क्षेत्रातला प्रवास सुरू झाला आणि तो साधेपणाने सुरू आहे एवढेच नाही तर तो प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. भारताने आता खाणीतल्या चोरीच्या उत्खननाचा पत्ता लावणारा एक उपग्रह अंतराळात पाठवण्याची योजना आखली आहे.

Leave a Comment