पुत्रेषणा


माणसाची धनेषणा आणि पुत्रेषणा ही त्याच्या विनाशाला कारण ठरते असे म्हणतात. म्हणजे आपल्याकडे पुढच्या सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती असावी असे लोकांना वाटते. आपल्या पोटी मुलगाच जन्माला यावा म्हणूनही लोक वाटेल ते करायला तयार होत असतात. गुजरातेत एका खेड्यातल्या शेतमजुरी करणार्‍या दांपत्याने मुलगा व्हावा म्हणून काय केले हे ऐकले तर नवल वाटते. या जोडप्याला एकूण १६ अपत्ये आहेत. आता आता काही वृद्ध लोक नव परिणित जोडप्यांना, अष्टपुत्रा होण्याचा आशीर्वाद देताना बिचकतात. पण, या पती पत्नीने दोन अष्टके पुरी केली. त्यांना एवढया मुलांना जन्म द्यावासा वाटावा एवढी काही त्यांची संपत्ती वाया चालली नव्हती. उलट जेवढी मुले होतील तेवढे दारिद्य्र वाढत चाललेय हे अनुभवाला येत होते तरीही मुलगाच हवा म्हणून त्यांनी १५ मुलींना जन्माला घातले.

या जोडप्यांचे नशीब असे की त्यांची मुलगा होण्याची इच्छा काही लवकर पुरी होईना. मुलगा होत नाही तोपर्यंत मुलींना जन्म द्यायचाच असे त्यांनी ठरवले होते. अनेक लोक अशी वाट पाहतात पण फार तर दोन किंवा तीन मुलींवर त्यांना मुलगा होतो. काही लोकांना पाच मुली होतात. पण, या दांपत्याची बातच काही औंर आहेे. त्यांना आठ मुलींनंतर पहिला मुलगा झाला. आता तरी आपण कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घ्यावी असा विचार त्यांनी करायला हवा होता पण त्यांना एक मुलगा पुरेसा नाही असे वाटले. एकाच्या ऐवजी आणखी एक मुलगा हवा अशी त्यांची भावना होती. काही लोकांना एक मुलगा झाला की त्याच्या मागे मग मुलगाच होतो पण या जोडप्याला एका मुलानंतर आणखी सहा मुलीच झाल्या. आता एवढ्या मुलींना सांंभाळणार तरी कसा असा प्रश्‍न त्याला पडला म्हणून त्यांनी आता शस्त्रकिया करून घेतली आहे.

आतापर्यंत या १६ मुलांतल्या दोन मोठ्या मुलींची लग्ने झाली आहेत. दोन मुली अगदी लहान आहेत आणि काही मुली आता विविध वयोगटात आहेत. दोन मुलींना कुटुंबाची गुजराण व्हावी म्हणून एका बड्या शेतकर्‍याकडे नोकरीला ठेवले आहे. आणखी १० मुली आणि एक मुलगा यांचा भार त्यांच्या डोक्यावर आहे. यातल्या पतीचे वय आता ५० वर्षे आणि पत्नीचे वय ४५ वर्षे आहे. मुलगा मोठा होऊन कमवायला लागेल तोपर्यंत या दोघांना कुटुंबाच्या निर्वाहासाठी कष्ट करावे लागणार आहेत. त्यांंच्या या मोठ्या कुटुंबात कोणीही शिकलेले नाही.

Leave a Comment