बँकांच्या व्याजदरात कपात


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी जनतेला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी जनतेला काही प्रमाणात दिलासा दिला. तसा तो दिला नसता तर त्यांच्या टीकाकारांनी, मोदींनी जनतेला कसलाही दिलासा दिला नाही अशी ओरड केली असती. जनतेला ज्या अर्थी काही दिलासा मिळाला नाही त्या अर्थी नोटाबंदीचा प्रयोग फसला आहे असाही निष्कर्ष काढायला त्यांनी मागेपुढे पाहिले नसते. तशी ओरड त्यांनी केली असती तर तिच्यात तथ्य होते कारण नोटाबंदीचा प्रयोग यशस्वी झाला हे जनतेला होणार्‍या फायद्यावरूनच कळत असते. शेवटी हा सारा अट्टाहास जनतेसाठीच आहे. तेव्हा नोटाबंदीच्या लाभातून आपण जनतेला ताबडतोब काय देऊ शकतो हे मोदी यांनी दाखवून दिले आहे.

खरे तर नोटाबंदी फसली म्हणणार्‍यांच्या कानाखाली काढलेला हा आवाज आहे पण त्यांना सभ्यपणाने वागायचेच नाही. म्हणून त्यांनी आता नोटाबंदीचे हे लाभ अंदाजपत्रकाच्या आधीच का जाहीर केले असा प्रश्‍न केला आहे. नोटाबंदीचे अनेक फायदे अंदाजपत्रकात येणारच आहेत पण ताबडतोब देता येणारे हे फायदे आहेत. हे फायदे जाहीर करण्याने अंदाजपत्रकाचा काहीही अधीक्षेप होत नाही कारण अशा प्रकारच्या अनेक घोषणा अनेकदा अंदाजपत्रकाच्या बाहेर करण्यात आल्या आहेत. यात नवीन काही नाही. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरात ०.९ टक्क्यांनी कपात केली आहे. नोटाबंदीच्या विरोधकांच्या कानाखाली काढलेला हा आणखी एक आवाज आहे. व्याजदराचे निर्णय तर नेहमीच अंदाजपत्रकाच्या बाहेर जाहीर केले जात असतात तेव्हा त्याच्याबाबत काहीही बोलण्याची सोय राहिलेली नाही.

स्टेट बँकेच्या आधी त्रावणकोर बँकेनेही अशीच घोषणा केली होती आणि आता स्टेट बँकेच्या नंतर पंजाब नॅशनल बँकेनेही अशी घोषणा केली आहे. अन्यही अनेक बँका आता या मार्गाने जाणार आहेत किंवा त्यांना जावेच लागणार आहे. बँकांत आलेल्या मोठ्या प्रमाणावरील नोटांचा हा परिणाम आहे. नोटाबंदीच्या आधी अनेकांनी – त्यात कथित अर्थतज्ज्ञही आलेच- असे म्हटले होते की व्याजदर घटवले जाणे हेच नोटाबंदीच्या यशाचे द्योतक ठरणार आहे. आता तसे ते घटायला लागले आहेत. म्हणजेच नोटाबंदीचा जमालगोटा लागू पडला आहे. असे दर घटले की ज्येष्ठ नागरिकांचे नुकसान होते. म्हणून आता सरकारने १० वर्षे त्यांच्या ठेवींना ८ टक्के दर कायम दिला जाईल असे जाहीर केले आहे.

Leave a Comment