सनबर्नचा वाद


गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांमध्ये पुण्याजवळ केसनंद येथे होत असलेल्या सनबर्न फेस्टिवलचा वाद बराच रंगत चालला आहे. हिंदू जनजागृती समिती आणि अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी या फेस्टिवलला तीव्र विरोध दर्शविला आहे. बराच वाद झाल्यानंतर या फेस्टिवलला देण्यात आलेल्या परवानगीचा विषय उच्च न्यायालयात गेला. परंतु उच्च न्यायालयाने महोत्सवाला हिरवा कंदील दाखवला. एकंदरीत सरकारची अनुमती मिळाल्यामुळे हे फेस्टिवल काल सुरू झाले. इलेक्ट्रॉनिक म्युझिक हे या सनबर्न उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. किंबहुना हा जगातला सर्वात मोठा अशा प्रकारचा उत्सव आहे. २८ तारखेला त्याचे उद्घाटन झाले तेव्हा त्या उद्घाटनाला पुण्यातील आणि पुण्याबाहेरील हजारो लोक हजर होते. सर्वांनी या संगीताला प्रतिसाद दिला आणि त्याचा आनंद लुटला.

काही संघटना मात्र या उत्सवाला विरोध करत आहेत. हा उत्सव भारतीय संस्कृतीशी साधर्म्य सांगणारा नाही अशी मुळात काही संघटनांची हरकत आहे. विशेष म्हणजे ज्या केसनंद या गावामध्ये हा महोत्सव होत आहे तिथल्या लोकांचाही या महोत्सवाला विरोध आहे. इथे येणारे रसिक लोक दारू पितात, नशिल्या पदार्थांचा वापर करतात आणि एकंदरीतच हा प्रकार फार भयानक असतो. त्यामुळे त्याला परवानगी देता कामा नये अशी त्याला विरोध करणार्‍या संघटनांची मागणी होती. परंतु हही मागणी सरकारनेही मान्य केली नाही आणि उच्च न्यायालयानेही तिची दखल घेतली नाही. अशा महोत्सवात काही लोक नशिल्या पदार्थांचा वापर करतही असतील आणि काही लोक मद्य प्रशान करत असतील. परंतु काही लोक व्यसनी आहेत म्हणून हजारो लोकांचा एखादा महोत्सव रद्दच करावा ही मागणी काही सयुक्तिक ठरत नाही.

अशा प्रकारच्या महोत्सवाला अनुमती देणे किंवा नाकारणे या गोष्टी भारतीय घटना आणि कायदा यांच्या अनुरोधाने केल्या जात असतात. त्या कायद्यामध्ये कोठेही असे म्हटलेले नाही की केवळ भारतीय संस्कृतीशी सांधा जोडणारे कार्यक्रमच करण्याची अनुमती असावी. पाश्‍चात्य संस्कृतीची छाप असणारे कार्यक्रम करता येणार नाहीत असे काही कायदा सांगत नाही. काही लोक नशिले पदार्थ वापरत असतील, काही दारू पित असतील तर त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकते. परंतु तेवढ्या कारणावरून महोत्सवच रद्द करावा ही मागणी काही सयुक्तिक नाही. पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचाच आहे. केसनंद गावच्या लोकांनीसुध्दा बंदीची मागणी करण्यापेक्षा या महोत्सवातून गावाला कोणता व्यवसाय मिळू शकतो हे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.

Leave a Comment