
भारताने अवकाश यानांच्या प्रक्षेपणाच्या क्षेत्रात फार मोठे पाऊल टाकलेले आहेच पण याच क्षेत्राशी संबंधित अशा क्षेपणास्त्राच्या क्षेत्रातही मोठी मजल मारलेली आहे. नुकतीच भारताने अग्नि ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे आपल्या देशाचे फार मोठे यश आहे. अनेक क्षेपणास्त्रे सोडली जातात आणि आपण त्यांच्या बातम्या वाचतो पण अग्नि ५ च्या बाबतीत तसे करून चालणार नाही कारण या क्षेपणास्त्राने अनेक विक्रम केले आहेत. तेव्हा त्याचे सारे तपशील आणि त्याच्या बाबतीतल्या काही खास बाबी समजून घेतल्या पाहिजेत. या क्षेपणास्त्राचा पल्ला पाच हजार किलो मीटर्सचा आहे. जगात एवढा लांबचा पल्ला असणारी क्षेपणास्त्रे तयार करण्यात केवळ चारच देशांना यश आले आहे. यात भारताचा पाचवा क्रमांक आहे. उर्वरित चार देश अमेरिका, चीन, रशिया आणि फ्रान्स हे आहेत.
अग्नी ५ बाबत महत्त्वाचे
हे क्षेपणास्त्र आपल्या सोबत १५०० किलो म्हणजे दीड टन वजनाची अण्वस्त्रे घेऊन जाऊ शकते. पण हे वजन एकाच अस्त्राचे नसेल. ते दोन पासून दहा पर्यंत कितीही अण्वस्त्रे सोबत नेऊ शकते. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय लष्कराला क्षेपणास्त्रांच्या वापराबाबत वैविध्य मिळेल. तीन टप्प्यात कार्यरत राहणारे हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब आणि ५० टन वजनाचे आहे. एवढे अजस्त्र क्षेपणास्त्र आपल्या सोबत १५०० किलो वजनाची अण्वस्त्रे घेऊन जेव्हा आपल्या लक्ष्याकडे झेप घेते तेव्हा त्याला अवकाशात सोडण्यासाठी तीन रॉकेट एंजिने वापरली जातात. ती या धुडाला पृथ्वीपासून ८०० किलो मीटर्स उंचावरून घेऊन जातेे. एवढी उंची आणि एवढा पल्ला गाठणारे हे क्षेपणास्त्र आपल्या शास्त्रज्ञांच्या कल्पना शक्तीचे द्योतक आहे. जगात फार कमी लोकांना संशोधनाची एवढी मजल मारणे शक्य झाले आहे.
जगात एका बाजूला क्षेपणास्त्रेही तयार होत आहेत आणि दुसर्या बाजूला अशा क्षेपणास्त्रांचा मारा झाला तर त्याला हवेतच हेरून पाहण्याची क्षमता असणारे रडारही तयार होत आहेत. तेव्हा असे रडार तैनात केले की कोणालाही अशा शक्तिशाली क्षेपणास्त्रांना आपल्या देशापर्यंत येण्याच्या आधीच नष्ट करता येते. पण अग्नि ५ चे वैशिष्ट्य असे की, जगातले कोणतेही क्षेपणास्त्र विरोधी रडार त्याला हवेत आगाऊ पाहू शकत नाही. त्यामुळे अशा रडार यंत्रणांना चकवून ते आपल्या लक्ष्यावर जाऊन आदळू शकते. त्याचा घात करू शकते. त्याला कोणतेही रडार अडवूही शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही.
