विरल आचार्य यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती


नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून विरल आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ फायनान्समध्ये विरल आचार्य हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तीन वर्षांसाठी विरल आचार्य यांची नियुक्ती असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अपॉईंटमेंट कमिटीने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.

गव्हर्नरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती झाल्यानंतर चारपैकी एक डेप्युटी गव्हर्नरपद रिक्त होते. या रिक्त पदावर विरल आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वनाथन, एस.एस.मुंद्रा, आर. गांधी या इतर तीन डेप्युटी गव्हर्नरबरोबर ते काम करतील. यातील मुंद्रा, गांधी यांची माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या काळात नियुक्ती करण्यात आली होती. तर विश्वनाथन यांची नियुक्ती विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात झाली आहे.

१९९५ साली आयआयटी पवई मधून विरल आचार्य यांनी बीटेक पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझिनेसमधून त्यांनी फायनान्समध्ये पीएचडी मिळवली. २००१ ते २००८ या काळात ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये होते. बँक ऑफ इंग्लंडमध्येही त्यांनी रिसर्च फेलो म्हणून काम पाहिले आहे.

Leave a Comment