नक्षलवाद्यांची शरणागती


गेल्या काही दिवसांपासून सरकारला नक्षलवादी चळवळीचा कणा मोडून काढण्यात चांगले यश मिळाले आहे. या चळवळीचा प्रभाव कमी होत असल्याने आणि तिच्यातली मूळ प्रेरणा नष्ट होत असल्यामुळे नक्षलवादी तरुण तिच्यातून बाहेर पडत आहेत आणि पोलिसांपुढे शरणागती पत्करत आहेत. चालू वर्षी अशा शरण आलेल्या आणि नवे सरळ आयुष्य सुरू करणार्‍या नक्षलवाद्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे. २०१५ साली ५७० नक्षलवादी शरण आले होते. त्यापूर्वीच्या वर्षातही अशा शरण आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या तीनशे ते चारशेच्या आसपास असे पण २०१६ च्या १५ डिसेंबर पर्यंत देशभरातले तब्बल १४५० म्हणजे २०१५ सालच्या आकड्यांपेक्षा तिप्पट नक्षलवादी शरण आले आहेत. नक्षलवाद्यांच्या विरोधातली सरकारची कारवाई दोन पदरी आणि तीही मोठी प्रभावी आहे. तिच्यामुळे हा फरक पडला आहे. नक्षलवाद प्रभावी भागात विकास योजनांचा अभाव असल्यामुळे गरिबी वाढलेली असतेच पण रोजगार मिळत नाही. सरकारी यंत्रणाही त्यांच्या विकासाबाबत उदासीन असते. त्यामुळे नक्षलवाद वाढलेला असतो.

अशा भागात सरकारने विकास कामांना गती दिली आहे. मात्र नक्षलवादी चळवळीच्या ज्येष्ठ नेत्यांना एक गोष्ट माहिती आहे की, विकास झाला की नक्षलवाद कमी होतो. म्हणून या लोकांनी सातत्याने विकास कामांत अडचणी आणायला सुरूवात केली. सरकारने या अडथळ्यांची दखल घेतली आणि निर्धाराने तसेच पोलिसांच्या बंदोबस्तात विकास कामे जारी ठेवली. त्याचा परिणाम होऊन काही प्रमाणात नक्षलवादी शरण आले. नाहीतरी आता आता आदिवासी तरुणांत शिक्षणाचे महत्त्व वाढत चालले आहे तसे तसे त्यांना या विचाराविषयीचे आकर्षण कमी वाटायला लागले आहे. एक ना एक दिवस या देशातले दिल्लीतले सरकार बरखास्त होईल आणि तिथे नक्षलवाद्यांचे सरकार येईल हे आदिवासी तरुणांना दाखवले जाणारे स्वप्न सत्यात कधीच उतरू शकणार नाही ही वस्तुस्थिती त्यांना कळायला लागली आहे. अशी जाणीव झालेल्या नक्षलवाद्यांनी शरणागती स्वीकारणे पसंंत करायला सुरूवात केली आहे. एका बाजूला नव्याने आकर्षित होणारे तरुण कमी आणि शरण येऊन या मार्गापासून दूर जाणारांची वाढलेली संख्या यामुळे ही कथित चळवळ आता दुबळी होत चालली आहे. या शरणागतीला सरकारच्या धोरणामुळेही मदत झाली आहे. कारण सरकारने शरण येणार्‍या नक्षलवाद्यांना पुनर्वसनासाठी भरघोस मदत देऊ केली आहे.

आता आता ही चळवळ जुनी होत चालली आहे. कोणत्याही चळवळीचे जे होते तेच याही चळवळीचे होत आहे. सुरूवातीला म्हणजे सत्तरच्या दशकात भूमिहीन खेडूतांत या चळवळीचे मोठे आकर्षण होते. त्यातून ही चळवळ बोकाळली आणि परदेशी मदतीवर पोसली गेली. पण जस जसे तिने हात पाय पसरायला सुरूवात केली तसे तसे तिच्यात निरनिराळ्या प्रवृत्तीचे लोक घुसले आणि मुळातला ध्येयवाद पातळ होत गेला. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील सरकारी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गिरीश कांत पांड्ये यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने नक्षलवादी आणि शरण आलेले नक्षलवादी यांच्या मन:स्थितीचा अभ्यास केला असता या प्रक्रियेवर प्रकाश पडला. जे आदिवासी तरुण या चळवळीत सहभागी होतात त्यातल्या ९२ टक्के तरुणांना नक्षलवादी चळवळीच्या तत्त्वज्ञानाविषयी एक शब्दही सांगता येत नाही. त्यातले ९० टक्के मुले आणि मुली केवळ लष्करी गणवेष मिळतो आणि हातात एक बंदूक येते या आकर्षणापोटी या चळवळीत सहभागी होतात. पण गळवेष आणि शस्त्राने पोटाचे प्रश्‍न सुटत नाहीत हे लक्षात येते तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो असे त्यांना आढळले.

ही चळवळ सोडून सामान्य जीवन जगणे पसंत करणारांत याच भ्रमनिरास झालेल्या तरुणांचा मोठा भरणा असतो. काही तरुणांना नक्षलवादी जीवन, नाच, घोषणा आणि वातावरण यांचे आकर्षण वाटते. ते जीवन जगतानाच दोन वेळचा खानाही मिळतो मग या चळवळीत यायला काय हरकत आहे असे मत गडचिरोलीच्या काही शरणागत नक्षलवाद्यांनी व्यक्त केले. मात्र या सगळ्या वातावरणाचा वीट आला की त्यांची बाहेर पडण्याची वाट दिसायला लागते. नक्षलवादी चळवळीला आता मतभेदांचेही ग्रहण लागत आहे. संघटनेतले अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते नव्या आणि तरुण नक्षलवाद्यांना वाईट वागणूक देतात. असे तरुण आत येताना ध्येयाच्या धुंदीत असतात पण त्यांना वातावरण नावडेनासे झाले की ते बाहरे पडतात. काही नक्षलवाद्यांना शरण आल्यानंतर सरकारची मोठी मदत मिळते. पती -पत्नी असलेले नक्षलवादी शरण आले तर त्यांना सरकारची १ लाख ५० हजाराची मदत मिळते. अशा नक्षलवाद्यांच्या मदतीने आता शरणागतीच्या प्रकारांत वाढ होत आहे. शरण कोण येऊ शकते, त्याची मन:स्थिती कशी आहे आणि काय केले म्हणजे एखादा नक्षलवादी शरण येईल याचा अंदाज या माजी नक्षलवाद्यांनाच येतो. तेच शरण येणारे तरुण हेरतात आणि त्यांची भाषा एक असल्याने त्यांना या तरुणांशी मनातल्या काही गोष्टी बोलता येतात. परिणामी असे तरुण बाहेर पडतात. ही गती वाढत आहे.

Leave a Comment