सापांची तस्करी


चोरटा व्यापार करणारे लोक नेमका कशाचा आणि कधी व्यापार करतील याचा काही नेम सांगता येत नाही. मात्र ज्या व्यापारावर सरकारची बंदी असेल आणि देशाबाहेरच्या काही बाजारांमध्ये त्याची मागणी असेल त्या वस्तू चोरट्या मार्गाने परदेशी पाठवण्यावर या तस्करांचा भर असतो. तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या सीमेवरील जंगलामध्ये विरप्पन नावाचा असाच एक तस्कर प्रदीर्घ काळ कार्यरत होता. चंदन आणि हस्तीदंत यांची निर्यात करून त्याने करोडो रुपये कमावले. या दोन वस्तुंना परदेशातून चांगलीच मागणी असल्यामुळे आणि सरकारची त्यांच्या निर्यातीवर बंदी असल्यामुळे असा चोरटा व्यापार भरभराटीला येत असतो. आपल्या देशातून बेडूकसुध्दा मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात. पण त्याची सर्वसाधारण लोकांना काहीच कल्पना नाही.

बेडूक हे निर्यात होत असतील हेच मुळात काही लोकांना माहीत नाही. परंतु त्यांच्या निर्यातीमुळे बेडकाची आपल्या देशातील संख्या कमी होते आणि त्याचे परिणाम पर्यावरणावर होतात. याच पध्दतीने सापसुध्दा मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात. पुणे जिल्ह्यातील चाकणजवळ कालच सापांची चोरटी निर्यात करणार्‍या काही लोकांना पकडण्यात आले. त्यांच्याजवळ निरनिराळ्या जातींचे जवळपास १५० साप होते. सापांच्या काही जाती जगातच दुर्मिळ झाल्या आहेत. त्यामुळे त्या अजूनही भारतासारख्या देशात मिळतात हे बाहेरच्या लोकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे भारतातून साप पकडून त्या देशांना निर्यात करणार्‍या शेतकर्‍यांना किंवा गावकर्‍यांना चांगला पैसा मिळतो. बुवा नावाचा एक साप आहे. तो अग्नेय आशियाई देशांमध्ये विकत घेतला जातो. तो भारतात मिळतो आणि त्याची निर्यात करणार्‍यांना अक्षरशः लाखो रुपये मिळतात.

कालच पुणे जिल्ह्यातील चाकण येथे असे १२५ साप एकत्र सापडले. त्यात काही साप इतक्या दुर्मिळ जातींचे आहेत की त्यांच्यासाठी परदेशांमध्ये लाखो रुपये देण्याची लोकांची तयारी आहे एका सापाच्या प्रकाराला तर १ कोटी रुपये इतकी किंमत येते. त्यामुळे असे साप पकडून त्यांची निर्यात करण्यास कर्नाटकाच्या दक्षिण भागातील कोलार जिल्ह्यातील काही लोक चटावलेले आहेत. अशा प्रकारच्या एका गँगला पोलिसांनी मागेच पकडले होते. सापांच्या कातडीपासून पर्स तयार केल्या जातात. शिवाय साप खाणारे काही लोक असतात. त्यांच्या मनात काही विशिष्ट साप खाल्ल्याने रोगराईपासून मुक्ती मिळते अशी कल्पना आहे. अशा भोळ्या कल्पना असणारे लोकच साप पकडण्याचे उद्योेग करत असतात.

Leave a Comment