आता सुरक्षित वाटते का?


आमीर खानच्या दंगल चित्रपटाने पहिल्या तीनच दिवसात शंभर कोटी रुपयांचा धंदा केला केला आणि शंभर कोटीपेक्षा अधिक धंदा करणार्‍या चित्रपटांच्या यादीत स्वतःच्या नावाचा समावेश केला. सध्या नोटाबंदीमुळे अनेक क्षेत्रातील आर्थिक व्यवहार मंदावले आहेत असे असतानाही दंगलने एवढा मोठा धंदा करावा हे त्या चित्रपटाचे यश वाखाणण्याजोगे आहे. २०१६ साली असा विक्रम केवळ सुलतान या चित्रपटानेच केला होता. मात्र चित्रपट क्षेत्रासाठी तरी २०१६ या वर्षाला निरोप देताना दंगलने आपल्या नावाची मोहोर उमटवली. दंगल हा आगळावेगळा चित्रपट आहे. कारण या चित्रपटाला रूढ अर्थाने जिला नायिका म्हणता येईल अशी नायिका नाही. आगळावेगळा विषय निवडला, आकर्षक आशय तेवढ्याच आकर्षकपणे मांडला तर चित्रपट चांगला धंदा करून जाऊ शकतो हे दंगलने सिध्द केले आहे.

मुळात मोठ्या पडद्यावरील चित्रपटाचा जमाना संपत आला आहे असे म्हटले जाते आणि एखादा चित्रपट लागल्याबरोबर त्याच्या चित्रफिती बाजारात उपलब्ध होत असल्यामुळे चित्रपटांचा धंदा मार खातो असे समजले जाते. मात्र अशी संकटे असूनसुध्दा दंगलने चित्रपटाच्या क्षेत्रात चांगलीच दंगल केली आहे. चित्रपटाचा निर्माता आमीर खान गतवर्षी देशातल्या एका वादात सापडला होता. त्याची लोकांना आता आठवण राहिलेली नाही. आमीर खानची पत्नी किरण राव हिने भारत देश तिला राहण्यासाठी असुरक्षित वाटतो असे आमीर खानजवळ म्हटले होते आणि आमीर खानने ही गोष्ट पत्रकारांना उघडपणे सांगितली होती. दंगल चित्रपटाचे यश पाहिल्यानंतर आमीर खान आणि त्याची पत्नी या दोघांचाही देश असुरक्षित असल्याचा कांगावा किती चुकीचा आहे हे लक्षात येते.

हा देश असुरक्षित आहे तर दंगल सारखा चित्रपट त्यांना कसा काढता आला. देश असुरक्षित असता तर चित्रपटाचे चित्रिकरण, पात्रांची निवड आणि त्याला चित्रपटगृहे उपलब्ध होणे अशक्य झाले असते. परंतु आमीर खानला दंगलची निर्मिती करताना त्यात काही अडचणी आल्याचे ऐकण्यात नाही. मात्र या देशात राहून या समाजाच्या अंगाखांद्यावर लहानाचे मोठे होऊन आणि कमालीचे सुरक्षित जीवन जगत असतानाही या लोकांना देश असुरक्षित कसा वाटतो हे समजत नाही. मात्र हे लोक ज्या अहमहमिकेने असुरक्षित असल्याची बोंब ठोकतात तेवढ्याच प्रांजळपणाने दंगल सारखा चित्रपट यशस्वी झाल्यानंतरही देश आपल्यासाठी असुरक्षित असल्याचे आपण म्हटले ही चूक झाली असे चुकूनही म्हणत नाहीत.

Leave a Comment