मतभेद टाळता येणार नाहीत का ?

combo
मुंबईत शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ होत आहे पण या मोक्यावरही आपण आपापसात भांडत आहोत. शिवसेना आणि भाजपा यांच्यातली कटुता याही प्रसंगी व्यक्त होत आहे आणि मनसेनेही या मतभेदांच्या प्रदर्शनात आता उडी घेतली आहे. जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्चुन हे देखणे स्मारक उभारण्यात येणार आहे. पूर्वी सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने या स्मारकाची कल्पना मांडली होती पण त्या सरकारला त्याच्या उभारणीचा प्रारंभ करता आला नाही. भाजपाच्या सरकारने या कामाला वेग दिला. पूर्वीच्या सरकारच्या वेगाने हे काम करण्यात आले असते तर पायाभरणी समारंभ व्हायला अजून किमान १० वर्षे लागली असती. सुमारे १८ हेक्टर जमिनीवर हे स्मारक होणार आहे. स्मारकाची पहिली सूचना मांडली गेली तेव्हा त्यावर फार तर पाचशे कोटी रुपये खर्च होतील असे म्हटले जात होते पण, आता हा आकडा तीन हजार कोटीवर गेला आहे. पूर्वी तो कमी असतानाही काही लोकांंनी मुळात हे स्मारक करणे गरजेचे आहे का असा सवाल खडा केला होता.

राज्यात अनेक लोक उपाशी असताना आणि शेतकरी आत्महत्या करीत असताना केवळ स्मारकांवर असे कोट्यवधी रुपये खर्च करणे कितपत सयुक्तिक आहे अशी चर्चा काही लोकांनी सुरूही केली होती. विशेषत: राज्य सरकार त्यावर एवढा खर्च करीत असताना या सरकारवर तीन लाख रुपये कर्ज आहे याचे तरी भान ठेवले जावे असे या लोकांचे म्हणणे होते. एका परीने या म्हणण्यात तथ्य आहे पण शेवटी असे महापुरुष हे राज्याचे भूषण असते. त्यांचे सार्‍या जगाने पहात रहावे असे स्मारक उभारण्याचा कोणी विचार केला तर तोही गरजेचा असतो. आता ही चर्चा मागे पडली आहे. पण त्यातच एक नवी चर्चा सुरू करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांनी लढाईत किल्ल्यांचा वापर कसा करावा हे दाखवून दिले होते. त्यामुळे राज्यातले किल्ले हेच त्यांचे खरे स्मारक ठरते. शिवाजी महाराजांचे हे भव्य स्मारक होतानाच त्यांचे खरे स्मारक म्हणजेच किल्ले मात्र पडायला झाले आहेत. त्यांच्या डागडुजीची गरज आहे. तेव्हा शिवाजी महाराजांच्या स्मृतीसाठी काही करण्याची इच्छाच असेल तर सरकारने हेच पैसे गडकोटांच्या डागडुजीवर खर्च करावेत असे आवाहन या किल्ल्यांच्या समर्थकांनी केले होते. गडकोट पडायला आले आहेत अाणि त्यांच्या डागडुजीची गरज आहे हे कोेणीच नाकारणार नाही. पण त्या डागडुजीसाठी स्मारकाचे काम रद्द करावे असे काही नाही.

स्मारकही होईल आणि डागडुजीही होईल अशीच सरकारची भूमिका आहे. उगाच हे दोन प्रश्‍न एकमेकांत गुंतवण्यात काही अर्थ नाही. सरकार या पायाभरणी समारंभाची फार जाहीरात करीत आहेे. तो जनतेचा कार्यक्रम असून कोणाही पक्ष किंवा नेत्याचा नाही. असे असले तरीही भाजपाचे नेते याकडे इव्हेन्टच्या दृष्टीकोनातून पहात आहेत. ही गोष्ट चटकन ध्यानात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज या दोन महापुरुषांच्या स्मारकांची कामे कॉंग्रेसच्या राज्यात प्रलंबित राहिली होती ती आपल्या कार्यकाळात मात्र वेगाने पुढे सरकली हे भाजपाला दाखवून द्यायचे आहे. विशेषत: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच हा पायाभरणी समारंभ होणार आहे. त्यामुळे या स्मारकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला तर त्यात फारसे काही वावगे नाही. मात्र स्मारकाचे श्रेय भाजपाकडे जायला लागल्यामुळे शिवसेनेसह अन्यही विरोधी पक्षांत विरोध वाढत आहे. शिवाजी महाराजांच्या या स्मारकाची संकल्पना मुळात कै. बाळासाहेब ठाकरे यांचीच असल्याचे शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात आधीच वाद होते ते आता हा शिवसेनेने हा वाद आता वाढवला आहे.

खरे म्हणजे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक असले पाहिजे ही कल्पना मांडायला ठाकरेच असावे लागतात असे काही नाही. कोणालाही ही कल्पना सुचू शकते. मुळात या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात येईल की नाही अशी शंका शिवसेनेच्या नेत्यांना येत होती. त्यांनी ती जाहीरपणाने व्यक्तही केली होती. पण महाराष्ट्र सरकारने या कार्यक्रमाला ठाकरे यांना केवळ पाचारणच केलेले आहे असे नाही तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे. यावर हा वाद संपायला हवा होता पण संपलेला नाही. या स्मारकाच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या समितीत शिवराज्य पक्षाचे नेते विनायक मेटे हे प्रमुख आहेत. पण गावागावातून पाणी आणि मातीचे कलश जमा करून त्यांची मिरवणूक काढताना मेटे यांना त्यांच्या इतमामाला शोभेल असा मान दिला नाही म्हणून ते रागावलेले आहेत. त्यांच्यावर पायाभरणीच्या कार्यक्रमात केवळ आभार मानण्याचे काम सोपवण्यात आले आहे. ते आता समितीच्या सल्लागार मंडळावर असले तरीही समारंभाला हजर राहणार नाहीत असे दिसते. एकंदरीत या पायाभरणीच्या तोंडावर महाराष्ट्र म्हणजे वाद हे सूत्र आपण सोडलेले नाही. पण तरीही स्मारक प्रेरणादायी आणि जगातल्या मोठ्या स्मारकात एक अशा इमारतीत करण्यात येणार आहे ही गोष्ट अभिमानाची आहे. या स्मारकापासून प्रेरणा घेऊन मराठी माणसांनी एकदिलाने नांदावे अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.

Leave a Comment