पोरकटपणाने अडचणीत

rahul-gandhi
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेन्द्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आता जाहीरपणाने केले असून त्यामुळे खळबळ उडण्याची अपेक्षा आहे पण या आरोपाचे वास्तव इतके वेगळे आहे आणि हे आरोपाचे प्रकरणच एवढे नाट्यमय झाले आहे की, त्यातून राहुल गांधीच अडचणीत सापडण्याची शक्यता दिसायला लागली आहे. नोटाबंदीच्या विरोधात देशव्यापी मोहीम सुरू केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून घेतलेल्या सभेत त्यांनी हा आरोप केला आहे. खरे तर ते नोटाबंदीच्या संबंधात काही तरी आरोप करतील असे वाटले होते पण, त्यांनी तो विषय सोडून दुसर्‍याच विषयात आरोप केला असल्यानेही या प्रकरणातले नाट्य वाढले आहे. नोटाबंदीच्या विरोधात सुरू असलेल्या विरोधकांच्या हल्ल्यात राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात थोडी रंगत आणली होती. आपल्याकडे मोदी यांच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, त्याचे ठोस पुरावेही आहेत आणि ते आपण जाहीर केले तर मोदी आपल्यासमोर उभेही राहू शकणार नाहीत अशी वल्गनाही त्यांनी केली होती. पण एक अट घातली होती की आपण हे पुरावे केवळ लोकसभेतच जाहीर करणार आहोत.

मोदी आपल्याला लोकसभेत बोलू देत नाहीत अशीही तक्रार राहुल गांधी यांनी केली होती. आपण क्षणभर हे मानून चालू की, राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलू दिले जात नसेलही पण त्यांच्याकडे मोदी यांच्या भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे आहेत तर ते पुरावे केवळ लोकसभेतच जाहीर करण्याचा अट्टाहास का करीत आहेत ? तसा प्रश्‍नही त्यांना विचारला गेला पण त्यावर त्यांनी तर्कशुद्ध उत्तर दिले नाही. आपण लोकसभेचे सदस्य आहोत म्हणून आपल्याला हे आरोप लोकसभेतच करायचे आहेत अशी सारवासारवी त्यांनी केली पण त्यात काही दम नाही. कारण ज्याने आपल्या प्रभावाने कॉंग्रेसचे वर्चस्वच नव्हे तर अस्तित्वही प्रश्‍नांकित केले आहे त्याच्या विरोधात ठोस पुरावा असेल तर तो गांधी यांनी लोकसभेत न जमले तर कोठेही जाहीर करायला हवा. तशी हिंमत राहुल गांधी यांच्यात नाही. त्यांना हे आरोप लोकसभेतच करायचे आहेत. कारण लोकसभा सदस्याला लोकसभेत कोणावर आरोप करायचे असतील तर त्याचे पुरावे दाखल करण्याची गरज नसते. खासदारांना घटनेने दिलेले ते संरक्षण आहे. त्याचा फायदा घेऊन राहुल गांधी यांना मोदींना पुराव्याविना बदनाम करायचे होते. नेमकेपणाने सांगायचे तर त्यांना मोदींच्या िवरोधात राळ उडवायची होती.

दरम्यान नोटाबंदीच्या निमित्ताने कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली संघटित होत असलेल्या विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांच्याकडे त्यांच्याकडील कथित पुराव्याबाबत चौकशी केली असता त्यांना काही समाधानकारक उत्तर देता आले नाही. ते ज्याला पुरावे म्हणत आहेत ते पुरावे ठोस तर नाहीतच पण ते करणारांचीच बदनामी होईल इतके ते ढिसाळ आहेत हे अन्य विरोधी पक्ष नेत्यांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी या संबंधात राहुल गांधी यांच्यापासून दूर राहण्यास तर सुरूवात केलीच पण ते राहुल गांधी यांची चेष्टा करायला लागले. आता नोटाबंदीवरून संघर्ष करण्यास एकटे राहुल गांधीच मैदानात उतरले आहेत. आपल्या हातात असलेले मोदी विरोधी पुरावे त्यांनी गुंडाळून ठेवले आणि या मोहिमेचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशात घेतलेल्या सभांत त्या पुराव्याचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. त्यावर घडलेल्या घटना मोठ्या नाट्यमय आहेत.

राहुल गांधी यांनी मोदी विरोधी पुरावे गुंडाळून तर ठेवलेच पण ते दोनच दिवसांत मोेदींना भेटायला गेले. त्यावर आप नेते अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधी यांना फैलावर घेतले. राहुल गांधी पुराव्याचा गौप्यस्फोट करीत नाहीत तसेच त्यांना भेटायला जातात याचा अर्थ त्यांनी मोदींशी तडजोड केली आहे असा आरोप करायला केजरीवाल यांनी सुरूवात केली. हातात पुरावे नसताना आणि सनसनाटीच्या नादात आपण केलेले मोदी विरोधी पुराव्याचे नाटक आपल्या अंगलट आले आहे हे राहुल गांधी यांच्या ध्यानात आले. आता पुरावे सादर न करावेत तर केजरीवाल आपला हल्ला तिखट करणार आणि मोदींचे राष्ट्रीय स्तरावरील विरोधक ही आपली प्रतिमा धोक्यात येणार ही गोष्ट राहुल गांधी यांना डाचायला लागली. तो धोका टाळण्यासाठी त्यांना आता मोदी यांच्या विरोधात काही तरी आरोप करणे भागच आहे हे लक्षात यायला लागले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काल मोदींना सहारा गटाकडून कोट्यवधी रुपये मिळाल्याचा आरोप ठोकून दिला.

हा आरोप काही नवा नाही. केजरीवाल यांनी आपल्या नेहमीच्या बेजबाबदारपणाने ते आरोप फार पूर्वीच केले होते आणि त्यावर त्यांचे जुने मित्र प्रशांत भूषण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने ते आरोप निराधार असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर खुद्द भूषण आणि केजरीवाल यांनी हे आरोप गुंडाळून ठेवले पण आता तेच आरोप राहुल गांधी यांनी पुन्हा केले. राहुल गांधी पोरकटपणा करून आरोपांच्या वल्गनांमुळे केजरीवाल यांच्या जाळ्यात अडकले पण त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांना केजरीवाल यांचेच उष्टे आरोप वापरावे लागले. त्यांचे दुर्दैव असे की या आरोपांनी ते आरोपातून सुटले तर नाहीतच पण आता मोदींच्या जाळ्यात अडकले आहेत. केजरीवाल तर त्यांना आता सोडणारच नाहीत कारण मोदींचे राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख विरोधक राहुल गांधी हे नसून आपण आहोत हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. राहुल गांधी हे किती पोरकट आहेत हे दाखवून देण्याची ही सुवर्णसंधी आहे. पण मोदीही राहुल गांधींना सोडणार नाहीत. या सार्‍या प्रकरणात राहुल गांधी यांची औकात मात्र दिसून आली.

Leave a Comment