पंजाबी जनमताची दिशा

election
गेल्या आठ नोव्हेंबरला सरकारने जारी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर जनता फार नाराज आहे असा प्रचार कॉंग्रेस, बसपा, आप इत्यादी पक्षांचे नेते करीत आहेत. राहुल गांधी यांनी तर नोटाबंदी हा ९९ टक्के जनतेचा अपमान आहे असा प्रचार सुरू केला आहे. पण या निर्णयापासून देशाच्या विविध भागांत झालेल्या विविध पातळ्यांवरील निवडणुकांत जनता नाराज नसल्याचाच संकेत मिळाला आहे. महाराष्ट्रात तर नगरपालिकांच्या पातळीवर नगण्य असलेल्या भाजपाला सर्वात मोठा पक्ष असा मान मिळाला आहे. गुजरातेतही भाजपाने जनमताच्या आधारावर कॉंग्रेसला धोबीपछाड दिली आहे. जनतेने सरकारच्या काळ्या पैशाच्या विरोधातल्या लढाईला पाठीबा दिला आहे असे निवडणुकांचे निकाल सांगतात.

आता याच निवडणुकांच्या पाठोपाठ झालेल्या चंडिगढ महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने सगळ्याच पक्षांची धुलाई केली आहे. या मनपाच्या २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने २० आणि त्याच्या मित्रपक्षाने म्हणजे अकाली दलाने १ जागा अशा एकूण २१ जागा जिंकल्या आहेत. या महापालिकेत भाजपाच्या हातात १५ जागा होत्या. जनता भाजपावर नाराज असल्याचा दावा करणारांना याची दखल घ्यावी लागेल की या मनपात भाजपाच्या जागांत सहा जागांची भर पडली आहे. पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या या शहरात हा निकाल कॉंग्रेसला विचार करायला लावणारा आहे कारण तिच्यात आता कॉंग्रेसचे बळ ९ वरून चार पर्यंत खाली आले आहे. नोटाबंदीच्या निर्णयावर सर्वात अधिक आगपाखड करणार्‍या मायावती यांच्या बसपाच्या हातात एक जागा होती तीही त्यांनी गमावली आहे.

येत्या काही दिवसांत पंजाबात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या राज्यात सध्या सत्तेवर असलेले भाजपा- अकाली सरकार पराभूत होणार असे बोललेे जात आहे. देशात सर्वत्र मार खाणारी कॉंग्रेस पार्टी पंजाबात सत्तेवर येईल असा काही पाहण्यांचा अंदाज आहे. हे सारे अंदाज प्रसिद्ध झाल्यापासून कॉंग्रेसचे नेते नटायला लागले होते पण चंडिगडच्या जनतेने त्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने तर या निवडणुकीतून पंजाबात पाय रोवण्याची स्वप्ने पहायला सुरूवात केली होती. पण त्यांचा स्वप्नभंग या निकालाने झाला आहे. सत्ताधारी भाजपा- अकाली आघाडीचे बळ कमी होण्याच्या ऐवजी वाढले आहे. राहुल गांधी यांच्या अपप्रचाराला हे जनतेने दिलेले चोख उत्तर आहे.

Leave a Comment