निश्‍चलीकरण त्यांचेही…

modi
भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा धाडसी निर्णय घेऊन ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या. परंतु या दोन नोटांमध्ये देशाचे ८६ टक्के चलन होते. त्यामुळे या नोटांना पर्यायी चलन उपलब्ध करून देण्यात विलंब झाला आणि त्यामुळे बराच गोंधळ माजला. मात्र या कसोटीच्या प्रसंगी भारतीय लोक संयमाने वागले आहेत या गोष्टीची नोंद करावीच लागेल. लोकांच्या मनात निर्माण झालेला असंतोष आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला परंतु पैसे मिळवण्याकरित रांगेत उभे असलेल्या लोकांनी आपल्याला त्रास होत असला तरी नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला आपला पाठिंबाच आहे. घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी ग्वाही देऊन विरोधकांच्या आगलावेपणाला चोख उत्तर दिले.

भारतीयांचा हा संयम किती वाखाणण्याजोगा आहे. हे पहायचे असेल तर व्हेनेझुएला या देशातील अशाच प्रसंगाशी त्यांची तुलना करावी लागेल. याही देशाने ११ डिसेंबर रोजी भारताप्रमाणेच नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. दक्षिण अमेरिकेतल्या या देशामध्ये बोलिव्हर हे चलन चालते. आता या देशाच्या सरकारने १०० बोलिव्हरच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या एकूण चलनापैकी ७७ टक्के चलन या नोटांमध्ये आहे. त्यामुळे निश्‍चलीकरणाचा निर्णय जाहीर होताच प्रचंड चलन तुटवडा निर्माण झाला आणि रांगेत उभे राहूनही लोकांना पैसे मिळेनात. तिथे लोकांच्या मनात निर्माण झालेल्या रागाचे रुपांतर हिंसाचारात झाले आहे. काही ठिकाणी लोकांनी केलेला हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.

व्हेनेझुएलाचे अर्थकारण तेलावर अवलंबून आहे आणि तेलाच्या किंमती घसरल्यामुळे बोलिव्हर या चलनाची किंमत घसरली आहे. १०० बोलिव्हरची नोट देऊन एक चॉकलेटसुध्दा मिळत नाही. एवढा चलन फुगवटा आणि महागाई झाली आहे. तेव्हा चलनाची घसरती किंमत सावरण्यासाठी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला. १०० बोलिव्हरची नोट रद्द करून तिच्या जागी ५०० बोलिव्हरची नोट दिली जाईल असे सरकारने जाहीर केले खरे पण ही नोट मिळालीच नाही. हा सारा पेचप्रसंग संयमाने हाताळण्यात तिथली जनता कमी पडली. भारतात मात्र या पेचप्रसंगात कोठेही हिंसाचार झालेला नाही. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्‍चलीकरणानंतर झालेल्या विविध जाहीर सभांमध्ये जनतेचे मन भरून कौतुक केले आहे.

Leave a Comment