कॉंग्रेसला दिलासा

pakistan
नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात कॉंग्रेसची बरीच पिछेहाट झाली होती. मात्र तिसर्‍या टप्प्याने कॉंग्रेसला दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद, नांदेड, भंडारा आणि गडचिरोली या चार जिल्ह्यातील २१ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या टप्प्यात झाल्या. सतत पिछेहाट सहन करणार्‍या कॉंग्रेसने या टप्प्यात मात्र भाजपाशी बरोबरी केली. २१ पैकी प्रत्येकी आठ ठिकाणी भाजपाचे आणि कॉंग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले. पहिल्या दोन टप्प्यात कॉंग्रेस पक्ष याबाबतीत भाजपापेक्षा फार मागे पडला होता मात्र या टप्प्यात भाजपाच्या पुढे जाता आले नसले तरी भाजपाशी बरोबरी करण्यात का होईना पण कॉंग्रेसला यश आले आहे. या टप्प्यात एकंदरीत ४१९ नगरसेवक निवडले गेले आणि नगरसेवकांच्या संख्येच्या बाबतीत मात्र कॉंग्रेसने भाजपाला मागे टाकले. कॉंग्रेसचे १२२ नगरसेवक निवडून आले तर भाजपाची ही संख्या ११६ वर रोखली गेली. या टप्प्यामध्ये भंडारा आणि नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीला काही तरी स्थान मिळेल असे वाटले होते परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ एक नगराध्यक्ष निवडून आला.

नगरसेवकांच्या संख्येच्या बाबतीतसुध्दा कॉंग्रेसला ६६ या संख्येपर्यंत सीमित रहावे लागले. राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेनेचेही बरेच नुकसान झाले आहे. शिवसेनेचे अस्तित्व औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात चांगल्यापैकी आहे. मात्र या निवडणुकीत या दोन्हीही जिल्ह्यांसह शिवसेनेचा एकही नगराध्यक्ष निवडून आला नाही. सदस्य संख्यासुध्दा ४५ वर सीमित झाली. कॉंग्रेसने मात्र अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्हा तसेच औरंगाबाद जिल्ह्यात उत्तम यश मिळाले. औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेसला दोन आणि भाजपाला दोन नगराध्यक्ष पदे मिळाली. नांदेड जिल्ह्यात मात्र निवडणुका झालेल्या ९ नगरपालिकांपैकी ६ नगरपालिका कॉंग्रेसला आणि १ अपक्ष आणि १ भाजपाला मिळाली. या दोन जिल्ह्यातल्या यशामुळे कॉंग्रेसला भाजपाशी बरोबरी करता आली. विदर्भात मात्र कॉंग्रेसला जबरदस्त मार बसला. विदर्भातील गडचिरोली आणि भंडारा या दोन जिल्ह्यातील ६ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिका भाजपाने जिंकल्या. कॉंग्रेसला एकही नगरपालिका जिंकता आली नाही. म्हणजे मराठवाड्याच्या दोन जिल्ह्यात भाजपाने एकतर्फी मार खाल्ला तर विदर्भातल्या दोन जिल्ह्यात एकतर्फी विजय मिळवला. शिवसेनेला दोन टप्प्यात बर्‍यापैकी यश मिळाले होते. शिवाय मराठवाड्याच्या दोन जिल्ह्यांमध्ये शिवसेना थोडीतरी बाजी मारेल अशी अपेक्षा होती पण शिवसेनेची निराशा झाली.

शिवसेनेला जे काही यश मिळाले आहे ते यश मर्यादित असले तरी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना उध्दव ठाकरे यांनी हे निव्वळ कार्यकर्त्यांचे यश आहे. आपण कोठेही प्रचाराला गेलो नव्हतो. तेव्हा आपण प्रचाराला न जाताही हे यश मिळाले आहे ते चांगलेच आहे असे मत व्यक्त केले होते. परंतु निवडणुकीतला विजय किंवा पराभव हा विजय किंवा पराभवच असतो. उध्दव ठाकरे हे प्रचाराला गेले असते तर यापेक्षा चांगले यश मिळाले असते असे त्यांना सूचित करायचे आहे. मात्र ते खरोखरच प्रचाराला गेले असते तर नेमके किती प्रमाणात यश मिळाले असते याचा कसलाही अंदाज व्यक्त करता येत नाही. जर उध्दव ठाकरे यांच्या प्रचाराला जाण्याने चांगलेच यश मिळणार होते. तर त्यांना प्रचाराला जाण्यास कोणी बंदी केली होती? त्यांनी चांगले यश मिळवायचेच नाही असे ठरवून निवडणूक लढवली होती की काय असे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. परंतु या प्रश्‍नांची तर्कशुध्द उत्तरे मिळत नाहीत. कारण निवडणूक निकालांचे विश्‍लेषण करताना नेते स्वतःची आणि कार्यकर्त्यांची फसवणूक करत असतात.

विशेषतः निवडणुकीत पराभव झाला की आपल्या विरोधकांनी सत्तेचा वापर केला, पैशाचा वापर केला म्हणून ते यशस्वी झाले असे विश्‍लेषण करण्याकडे पराभूत पक्षांचा कल असतो. आताही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजपाने सत्तेचा गैरवापर केला म्हणून ते विजयी झाले अशी कारणमीमांसा करायला सुरूवात केली आहे. खरे म्हणजे ही पराभवानंतरची आदळआपट आहे. राज्यात सत्तेवर असलेला पक्ष नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चार आश्‍वासने देणारच. कॉंग्रेसने सत्तेवर असताना यापेक्षा वेगळे काय केले होते? मग विकासाची आश्‍वासने देणे हा जर गैरप्रकार असेल तर कॉंग्रेसने भाजपाच्या अशा सत्तेच्या गैरवापराच्या विरोधात निवडणूक आयोगाने एखादी तरी तक्रार का केली नाही? प्रचाराच्या मैदानात नेहमीच बेलगाम आरोप केले जातात. सध्या उत्तर प्रदेशात अशाच बेलगाम आरोपांच्या फैरी झडत आहेत. तेव्हा अशा आरोपांवरून कोणाच्याही जय किंवा पराजयाचे विश्‍लेषण होता कामा नये. तसे ते केले गेले तर ते तर्कशुध्द असत नाही आणिअशा पराभवातून सावरण्यासाठी त्या पक्षाला अशा विश्‍लेषणाचा उपयोगही होत नाही. कॉंग्रेस पक्ष सध्या मोठ्या कठीण परिस्थितीतून वाटचाल करत आहे. या स्थितीतून या पक्षाला सावरायचे असेल तर आपल्या वाटचालीचे आणि त्यातील विविध टप्प्यांचे तर्कशुध्द विवेचन त्या पक्षाने केले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही.

Leave a Comment